मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये एका तरुणाने आपल्या पत्नीच्या छळाला कंटाळून एक व्हिडीओ बनवला. हा व्हिडीओ कुटुंबाला पाठवल्यानंतर तरुण बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यानंतर त्याची पत्नीही बेपत्ता झाली. पोलिसांनी दोघांचीही बेपत्ता झाल्याची नोंद करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
शहरातील आधारताल परिसरातील निर्भय नगर येथील रहिवासी आनंद दुबे याने त्याच्या पत्नीवर छळाचा आरोप करणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आणि तेव्हापासून तो बेपत्ता आहे. आनंदचा मोबाईलही बंद आहे. या घटनेनंतर त्याची पत्नीही घरातून बेपत्ता झाली.
व्हिडिओमध्ये आनंद म्हणाला, "फक्त मुलीच नाही तर मुलंही घरगुती हिंसाचाराला बळी पडतात." बेपत्ता होण्यापूर्वी त्याने त्याच्या पालकांची आणि बहिणीची माफीही मागितली. पोलिसांनी आता आनंदचा शोध सुरू केला आहे. कुटुंबातील सदस्यही चिंतेत आहेत.
आधारताल पोलीस ठाण्याचे प्रभारी वीरेंद्र खटिक यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हिडिओबद्दल माहिती मिळाली आहे. आनंद आणि त्याच्या पत्नीचा शोध सुरू आहे. या प्रकरणाची चौकशी केली जात आहे. चार वर्षांपूर्वी आनंदचं लग्न झालं. सुरुवातीला सगळं ठीक होतं, पण नंतर पती-पत्नीमध्ये छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद होऊ लागले.
कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, आनंद मानसिक तणावाखाली होता. व्हिडिओमध्ये आनंदने आपल्या समस्या सर्वांना सांगितल्या आणि समाजातील पुरुषांवरील घरगुती हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित केला. व्हायरल व्हिडिओनंतर, पोलीस आणि कुटुंब त्याचा शोध घेत आहेत, परंतु अद्याप कोणताही सुगावा लागलेला नाही.