आपने झाडली किरण बेदींवर आरोपांची फैर
By admin | Updated: January 23, 2015 23:06 IST
नवी दिल्ली-दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाच्या भाजपा उमेदवार किरण बेदी यांच्यावर शरसंधान साधताना आपचे नेते कुमार विश्वास यांनी, लोकपाल आंदोलनादरम्यान बेदी भाजपावरील हल्ल्याच्या विरोधात असल्याचा आरोप केला आहे. विश्वास यांनी केलेल्या आरोपानंतर काँग्रेसनेही आपवर हल्ला चढवीत, केंद्रातील सत्ताधारी पक्षासोबत त्याचे जवळीकीचे संबंध असल्याचे म्हटले आहे.
आपने झाडली किरण बेदींवर आरोपांची फैर
नवी दिल्ली-दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाच्या भाजपा उमेदवार किरण बेदी यांच्यावर शरसंधान साधताना आपचे नेते कुमार विश्वास यांनी, लोकपाल आंदोलनादरम्यान बेदी भाजपावरील हल्ल्याच्या विरोधात असल्याचा आरोप केला आहे. विश्वास यांनी केलेल्या आरोपानंतर काँग्रेसनेही आपवर हल्ला चढवीत, केंद्रातील सत्ताधारी पक्षासोबत त्याचे जवळीकीचे संबंध असल्याचे म्हटले आहे. बेदी यांनी केजरीवालांसह आपच्या अनेक नेत्यांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगून विश्वास यांनी, त्यातून भाजपाप्रणीत राज्यांमधील भ्रष्टाचार पुढे येऊ नये असा त्यांचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. पुढे बोलताना कुमार यांनी, भ्रष्टाचारविरोधी अंादोलनात काही व्यक्ती अशा होत्या ज्यांना भाजपावर हल्ला चढवू नये असे वाटत होते. लोकपालाचे आंदोलन संपल्यानंतर बेदींनी अनेकदा, राजकारणात कमी वाईटाची निवड केली जाते असे विधान अनेकदा केले होते याचे स्मरण करून दिले. जेव्हा आपची स्थापनाही झाली नव्हत तेव्हा केजरीवालांनी आपल्या मुलाखतीत, आम्ही बेदींसोबत बोलणी केली असून त्या भाजपावरील हल्ल्याच्या विरोधात असल्याचे सांगितले होते, अशीही आठवण विश्वास यांनी यावेळी करून दिली. कोळसा घोटाळा समोर आल्यानंतर जेव्हा आम्ही पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या निवासस्थासमोर निदर्शने केली होती. तसेच नितीन गडकरी यांच्याही निवासस्थानासमोर निदर्शन केले होते. मात्र गडकरी यांच्या घरासमोर झालेल्या निदर्शनात बेदी सहभागी झाल्या नव्हत्या असे त्यांनी पुढे म्हटले. आपचे वरिष्ठ नेते संजय सिंग यांनी, बेदी यांच्या कारवाया या भाजपाप्रती त्यांची सहानुभूती स्पष्ट करणाऱ्या होत्या असे म्हटले आहे. काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी केजरीवाल व बेदी यांच्यावर हल्ला चढविताना, भ्रष्टाचारविरोधी आंदोलनादरम्यान हे दोघेही फक्त काँग्रेसलाच आपले लक्ष्य ठरवीत असल्याचे म्हटले आहे. ते निवडक पद्धतीने हल्ले चढवीत होते. भाजपाच्या शासनकाळात कर्नाटकातील खाण घोटाळ्यांबाबत ते काहीही बोलत नव्हते. आप भाजपाविरोधी असल्याचा दावा कसे काय करते कारण अशी अफवा होती की, इंडिया अगेन्स्ट करप्शन ही भाजपाचीच दुसरी फळी होती असे तिवारी यांनी पुढे म्हटले आहे. भाजपाचे प्रवक्ते जी.व्ही.एल. नरसिंह राव यांनी, आप आता राजकीय हेतूंचे आरोप करीत आहे, मात्र सोनिया गांधी यांना राष्ट्रीय सल्लागार परिषदेत जागा मिळवून देण्यासाठी दिग्विजयसिंग यांच्यासोबत बोलणी का केली होती याचे उत्तर केजरीवालांनी द्यावे असे म्हटले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस अजय माकन यांनी, आता सर्व बाबी स्पष्ट होत आहेत. केजरीवाल, बेदी व जनरल व्ही.के. सिंग हे अण्णा हजारे यांना भाजपाबाबत मवाळ धोरण घेण्यासाठी व काँग्रेसविरुद्ध बोलण्यासाठी तयार करीत होते असे म्हटले आहे. अण्णा टीमला प्रभावित करण्याच्या प्रयत्नाबाबत बेदी यांना विचारणा केली असता, त्यांनी मौन साधले. आपचे नेते आशुतोष यांनी, आपला पक्ष हा खासगी मर्यादित कंपनी नाही ज्यात काँग्रेससारखी संस्कृती असेल असे म्हटले आहे.