Yogi Adityanath Disha Patani house attack : उत्तर प्रदेशातील बरेली येथील बॉलीवूड अभिनेत्री दिशा पटानी हिच्या घरी झालेल्या गोळीबाराची घटना सध्या चर्चेत आहे. पोलिसांनी या प्रकरणात कारवाई करत दोन आरोपींना चकमकीत ठार मारले. तर दोघांना अटक केली. याचदरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे या प्रकरणासंबंधी एक विधान समोर आले आहे. मुख्यमंत्र्यांनी गोळीबार घटनेत अटक केलेल्या एका हल्लेखोराची तुलना मारीच राक्षसाशी केली आहे.
शनिवारी लखनौ येथील लोकभवन येथे झालेल्या एका समारंभात मुख्यमंत्री म्हणाले, "काल तुम्ही पाहिले की महिलांवरील गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला एक गुन्हेगार राज्याबाहेरून आला होता. तो कदाचित मारिच (वेशभूषा बदलून आलेला राक्षस) सारखाच घुसला असेल, परंतु जेव्हा त्याला उत्तर प्रदेश पोलिसांनी गोळी मारली, तेव्हा तो ओरडत होता की तो चुकून उत्तर प्रदेशात आला आणि पुन्हा कधीही असे करण्याचे धाडस करणार नाही. महिलांच्या सुरक्षेला हानी पोहोचवणाऱ्या, त्यांच्या प्रतिष्ठेला आणि स्वावलंबनाला बाधा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रत्येक गुन्हेगाराला आमचे पोलिस सोडणार नाहीत. त्यांचा खात्मा होईल किंवा त्यांना हे राज्य सोडून जावेच लागेल."
चकमकीनंतर दोन आरोपींना अटक
बरेली पोलिसांच्या म्हणण्यानुसार, अभिनेत्री दिशा पटानीच्या बरेली येथील वडिलोपार्जित घरी गोळीबार करणाऱ्या पाच आरोपींपैकी एक असलेल्या रामनिवासला गेल्या शुक्रवारी झालेल्या चकमकीनंतर त्याचा साथीदार अनिलसह अटक करण्यात आली. वरिष्ठ पोलिस अधीक्षक (एसएसपी) अनुराग आर्य यांनी सांगितले की, ही चकमक बरेलीमध्ये झाली, ज्यामध्ये आरोपी रामनिवासच्या पायाला गोळी लागली. घटनेच्या व्हायरल व्हिडिओमध्ये रामनिवास हात जोडून जमिनीवर पडलेला दिसला आणि पोलिसांना म्हणाताना दिसला की, मी कधीही बाबांच्या उत्तर प्रदेशात येणार नाही. माझी चूक झाली. यावरून योगींनी विधान केले.
दिशा पटानीच्या घरावर हल्ला का?
१२ सप्टेंबरला पहाटे ३:४५ वाजता दिशा पटानीच्या बरेली येथील घरी दुचाकीवरून आलेल्या दोन गुन्हेगारांनी सुमारे नऊ राउंड गोळीबार केला. हल्ल्यानंतर, टोळीने सोशल मीडियावर जबाबदारी स्वीकारली. त्यांनी दावा केला होती की अभिनेत्रीची बहीण खुशबू पटानीने प्रेमानंद महाराज आणि अनिरुद्धाचार्य यांच्याबद्दल केलेल्या टिप्पणीचा बदला म्हणून हा गोळीबार करण्यात आला आहे.