Yogi Adityanath on Mathura : उत्तर प्रदेशातील अयोध्या आणि काशीसोबतच मथुरेची अनेकदा चर्चा होते. या मुद्द्यावर अनेक याचिकाही न्यायालयात प्रलंबित आहेत. अशातच, राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मथुरेबाबत एक सूचक विधान केले आहे. बरसाना येथे बोलताना योगी म्हणाले की, 'आम्ही अयोध्येला एक सुंदर शहर बनवले. प्रयागराजही सूर्याप्रमाणे चमकतोय. आता मथुरेची बारी आहे.' मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याने नवीन चर्चांना उधाण आले आहे.
सीएम योगी मथुरा येथील बरसाणाच्या रंगोत्सव कार्यक्रमात सहभागी झाले होते. येथे आजपासून रंगोत्सवाला सुरुवात झाली आहे. लठमार होळीपूर्वी आजपासून येथे फुलांची होळी साजरी केली जाते.
या कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, 'महाकुंभाच्या भव्य कार्यक्रमानंतर आज मी होळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि राधा-राणीचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो आहे. आपली ब्रजभूमी ही भारतातील सनातन धर्मावरील अथांग भक्तीची भूमी आहे. आपले सौभाग्य आहे की, बाबा विश्वनाथांचे निवासस्थान काशी आहे. मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचे पवित्र जन्मस्थान अयोध्या आणि लीलाधारी श्री कृष्णाची जन्मभूमी मथुरा, वृंदावन आणि बरसाना आपल्याच राज्यात आहे.'
थोडी वाट पाहा...सीएम योगी पुढे म्हणतात, 'अयोध्या-काशीनंतर आता यमुनामातेची बारी आहे. यमुनामातेला सांगायला आलोय की, आता दिल्लीतही रामभक्तांचे सरकार आले आहे. त्यामुळे समजून जा की, गंगेच्या धर्तीवर यमुनादेखील लवकरच शुद्ध होईल. आता ती वेळ फार दूर नाही, त्यामुळे थोडी वाट पाहा...' असेही योगी यावेळी म्हणाले.