‘वर्क फ्रॉम होम’मुळे कुटुंबांमध्ये वाढला तणाव, IIT मधील तज्ज्ञांच्या अभ्यासातून स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 05:55 AM2023-01-23T05:55:59+5:302023-01-23T05:56:25+5:30
कोरोना महामारीच्या काळात ‘वर्क फ्रॉम होम’ हा शब्द परवलीचा बनला होता. आता देशातील कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आला तरी अनेक उद्योगांनी घरून काम करण्याची पद्धत सुरूच ठेवली आहे.
नवी दिल्ली :
कोरोना महामारीच्या काळात ‘वर्क फ्रॉम होम’ हा शब्द परवलीचा बनला होता. आता देशातील कोरोना पूर्णपणे नियंत्रणात आला तरी अनेक उद्योगांनी घरून काम करण्याची पद्धत सुरूच ठेवली आहे. उद्योगांना ही पद्धत सोयीची वाटते; परंतु यामुळे कर्मचाऱ्यांच्या कौटुंबिक जीवनावर वाईट परिणाम झाल्याचे दिसत असून त्यांच्यात नैराश्य वाढू लागले आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) मद्रास आणि भारतीय व्यवस्थापन संस्था (आयआयएम) अमृतसर येथील तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासातून हे दाखवून दिले आहे. हा अभ्यास ‘एम्प्लॉई रिलेशन्स’ या प्रख्यात नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.
यावर उपाय काय?
कर्मचाऱ्यांवर नकारात्मक परिणाम होऊ नये, यासाठी ‘कर्मचारी समस्या - केंद्रित धोरण’ गरजेचे आहे. त्यानुसार नियोजन करून उपाययोजनांची अंमलबजावणी करावी. कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय तसेच मित्रांपर्यंत सक्रियपणे पोहोचणे गरजेचे आहे.
कोणता अभ्यास केला?
- ‘वर्क फ्रॉम होम’मुळे कर्मचाऱ्यांच्या कार्यालय आणि कुटुंब यातील सीमामर्यादांचे उल्लंघन झाले आहे का?
- ही संकल्पना फलदायी किंवा अपयशी ठरण्यात स्त्री-पुरुष भेद भूमिका बजावतो का?
- ही पद्धत मोठ्या नोकरदारांनी कोरोनानंतरही चालू ठेवल्यामुळे अनेक कर्मचारी नाखूश आहेत.
- यामुळे विवाहितांमध्ये मोठ्या प्रमाणात ताण निर्माण झाला. त्यांच्या नात्यात नवीन गुंतागुंत निर्माण झाली.
संशोधनात नेमके काय?
- ‘वर्क फ्रॉम होम’मुळे कौटुंबिक जीवनावर नकारात्मक परिणाम. कार्यालयीन कामांनाही फटका बसला आहे.
- कर्मचाऱ्यांमध्ये आपण एक अपयशी पालक, अयशस्वी व्यावसायिक आहोत, अशी भावना बळावू लागली आहे.
- भारतात पारंपरिक स्त्री-पुरुष भेदामुळे कुटुंबांमध्येही आणखी तणाव निर्माण झाला आहे.