Kerala Accident :केरळमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील कोल्लममध्ये एक भीषण रस्ता अपघात झाला, ज्यात एका वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाला. तर, या अपघातात इतर 7 जण जखमी झाले आहेत. सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेतील मृत महिला आपल्या पतीला उपचारासाठी रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होती.
मिळालेल्या माहितीनुसार, एक वृद्ध महिला आपल्या आजारी पतीला रुग्णावाहिकेतून हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होती. वाटेत कोंबड्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची ॲम्ब्युलन्सला जोरदार धडक बसली. या घटनेत वृद्ध दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला, तर इतर 7 जण गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कोट्टारकारा येथील एमसी रोडवरील सदानंदपुरम येथे मध्यरात्रीनंतर हा अपघात झाला. अपघात झालेल्या रुग्णवाहिकेत रुग्णवाहिका चालक आणि त्याच्या मुलीसह एकूण पाच जण प्रवास करत होते. तर, अपघाताच्या वेळी कोंबड्या घेऊन जाणाऱ्या ट्रकमध्ये चार जण प्रवास करत होते. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
ओडिशामध्ये 3 दिवसांपूर्वी असाच एक दुर्दैवी अपघात झाला होता. येथील भद्रक जिल्ह्यात 26 वर्षीय तरुण, त्याचा मेव्हणा आणि वडिलांचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिका चालकाचा मृत्यू झाला. मागून येणाऱ्या डंपरने रुग्णवाहिकेला धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात मृत तरुणाची आई गंभीर जखमी झाली असून, तिला भोगराई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.