अमरोहा - बऱ्याच लोकांना घरात मांजर किंवा श्वान पाळण्याची सवय असते. हे पाळीव प्राणी आपल्या घरातीलच एक सदस्य म्हणून कायम सोबत राहतात. मात्र उत्तर प्रदेशातील अमरोहा येथे मांजरीचं आणि महिलेच्या प्रेमाचं अनोखं प्रकरण समोर आलं आहे. याठिकाणी एका महिलेला मांजरीच्या मृत्यूचा विरह सहन न झाल्याने तिने २ दिवसांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती कळताच पोलिसांनी घटनास्थळी जात महिलेचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमोर्टमला पाठवला आहे.
अमरोहा जनपदच्या हसनपूर कोतवाली भागात राहणाऱ्या ३२ वर्षीय महिलेनं हे टोकाचं पाऊल उचलले आहे. पूजा नावाच्या या मृत महिलेचं ८ वर्षापूर्वी दिल्लीतील तरूणासोबत लग्न झाले होते. मात्र लग्नाच्या २ वर्षांनी या दोघांमध्ये घटस्फोट होऊन नातं संपुष्टात आले. त्यानंतर पूजा माहेरीच राहत होती. एकटेपणा दूर करण्यासाठी तिने मांजर पाळली होती.
विरहात उचललं नको ते पाऊल...
कुटुंबाच्या माहितीनुसार, गुरुवारी मांजरीचा मृत्यू झाला होता. पूजाच्या घरच्यांनी मांजरीचा मृतदेह पुरण्यास सांगितले तेव्हा पूजाने स्पष्ट नकार दिला. माझी मांजर पुन्हा जिवंत होईल असं पूजा सातत्याने म्हणत होती. इतकेच नाही तर २ दिवस ती मांजरीच्या मृतदेह छातीला कवटाळून राहत होती. शनिवारी दुपारी तिला मांजरीच्या जाण्याचा विरह सहन झाला नाही तेव्हा तिने नको ते पाऊल उचचले. पूजाने घराच्या तिसऱ्या मजल्यावरील खोलीत जात पंख्याला गळफास घेत आयुष्य संपवलं असं तिच्या आईने सांगितले.
दरम्यान, जेव्हा आई पूजाला आवाज देत तिसऱ्या मजल्यावर गेली तेव्हा खोलीत लटकलेला मुलीचा मृतदेह पाहून ती जोरात किंचाळली. त्यानंतर घरातील सगळे खोलीत धावत आले तेव्हा पूजाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत होता. त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेतला. त्यानंतर पुढील कार्यवाही करत मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवला. सध्या पोलीस या घटनेचा आणखी तपास करत आहेत.