येत्या १५ एप्रिलपासून रेल्वेच्या तत्काळ तिकीट बुकिंगची वेळ बदलणार आहे, असा दावा करणाऱ्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अचानक एखाद्या ठिकाणी जायचे असेल किंवा सामान्य बुकिंगवेळी तिकीट मिळाले नाही तर तत्काळमध्ये काढता येईल म्हणून जे ट्रेन सुटण्याच्या आदल्या दिवसाची वाट पाहत असतात त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी होती. एकंदरीतच सर्वच रेल्वे प्रवाशांसाठी ही महत्वाची बातमी होती. यावर रेल्वेने माहिती दिली आहे.
भारतीय रेल्वेने या तत्काळ तिकीट बुकिंगच्या वेळेत बदल होणार असल्याच्या दाव्याचे खंडन केले आहे. तत्काळ आणि प्रिमिअम तत्काळ तिकीट बुकिंगच्या वेळेत कोणताही बदल केला जाणार नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
सोशल मीडिया पोस्टमध्ये याबाबतचे दावे करण्यात आले आहेत. यामुळे रेल्वे तिकीटे बुकिंग करणाऱ्या प्रवाशांमध्ये खळबळ उडाली होती. अनेकजण या पोस्टमध्ये दिलेल्या वेळेत तिकीट बुक करायला जाणार होते आणि फसणार होते. ही फसवणूक टाळण्यासाठी रेल्वेने एक्स अकाऊंटवर हे दावे फेटाळणारी पोस्ट केली आहे.
आयआरसीटीसीने स्पष्ट केले आहे की तत्काळ तिकीट बुकिंगच्या वेळेत कोणताही बदल झालेला नाही. तुम्ही १५ एप्रिल रोजी किंवा त्यानंतर तत्काळ तिकीट बुक करण्याचा विचार करत असाल तर काळजी करू नका, तिकीट बुकिंगची वेळ पूर्वीसारखीच असणार आहे, असे आयआरसीटीसीने म्हटले आहे.
कोणत्याही एसी किंवा नॉन-एसी वर्गाच्या तत्काळ किंवा प्रीमियम तत्काळ तिकिटांच्या बुकिंग वेळेत कोणताही बदल केलेला नाही. याशिवाय, तिकीट एजंटसाठी बुकिंग वेळा देखील पूर्वीसारख्याच राहतील, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.