रिझर्व्ह बँकेने ३० सप्टेंबरपर्यंत एटीएममधून ५०० रुपयांची नोट पुरवणे बंद करण्याचे आदेश दिल्याचा मेसेज व्हायरल झाला. त्यानंतर ५०० रुपयांची नोट एटीएममधून मिळणं बंद होणार, अशी चर्चा सुरू झाली. मोदी सरकारने मात्र हा मेसेज असत्य असून, एटीएममधून ५०० रुपयांच्या नोटांचा पुरवठा करणे बंद करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे स्पष्ट केले. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
कोणत्याही मोठे मूल्य असलेल्या नोटांची छपाई करण्याचा निर्णय केंद्र सरकार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाशी चर्चा करून घेतं. जेणेकरून दररोजच्या व्यवहारात वेगवेगळ्या नोट उपलब्ध राहाव्यात, असेही चौधरी म्हणाले.
५०० रुपयांची नोट, केंद्र सरकारचे सविस्तर उत्तर
केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लेखी उत्तर सांगितले की, "आरबीआयने व्यवहारात जास्त प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या नोटा लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून २८ एप्रिल २०२५ पर्यंत एटीएममधून १००, २०० रुपयांच्या नोटा जास्त ठेववण्याबद्दल परिपत्रक काढले आहे. आरबीआयने बँकांना एटीएममध्ये १०० आणि २०० रुपयांच्या नोटा जास्त ठेवण्याचे निर्देश दिले आहेत."
"जवळपास ७५ टक्के एटीएममध्ये ३० सप्टेंबरपर्यंत कमीत कमी एक कॅसेट (पेटी) १०० रुपये किंवा २०० रुपयांच्या नोटा ठेवल्या जातील. ३१ मार्च २०२६ पर्यंत ९० टक्के एटीएममधून कमीत कमी एक कॅसेट १०० रुपये वा २०० रुपयांच्या नोटा उपलब्ध करून दिल्या जातील", असेही केंद्रीय अर्थमंत्र्यांनी राज्यसभेत दिलेल्या उत्तरात सांगितले.
सरकार म्हणाले, तो मेसेज खोटा
सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत होता, ज्यात म्हटले गेले होते की, आरबीआयने ३० सप्टेंबरनंतर ५०० रुपयांच्या नोटा एटीएममधून देणे बंद करण्याचा आदेश बँकांना दिला आहे. सरकारने सांगितले की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने असे कोणतेही आदेश दिलेले नाहीत. व्हायरल होत असलेला तो मेसेज खोटा आहे.