Jammu Kashmir Attack : जम्मू आणि काश्मीरच्या पहलगाममध्ये आज(22 एप्रिल 2025) दहशतवादी हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या दहशतवादी हल्ल्यात एका पर्यटकाचा मृत्यू झाला, तर 12 पर्यटक जखमी झाल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर लष्कराने परिसराला वेढा घातला असून, शोध मोहीम सुरू केली आहे. या हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींनी गृहमंत्री अमित शाहा यांच्याशी फोनवर चर्चा केली आणि त्यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले.
'दहशतवाद्यांना सोडणार नाही...'पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र निषेध केला. पंतप्रधान मोदी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हणाले, 'जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले, त्यांच्याबद्दल माझ्या संवेदना आहे. जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो. पीडितांना शक्य तितकी सर्व मदत पुरवली जाईल. या घृणास्पद कृत्यामागील लोकांना सोडणार नाही. त्यांचा नापाक अजेंडा कधीही यशस्वी होणार नाही,' अशी प्रतिक्रियी पीएम मोदींनी व्यक्त केली.
गृहमंत्री अमित शाहा श्रीनगरला रवानापहलगाम हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शाहा यांनी आपत्कालीन बैठक बोलावली ज्यामध्ये आयबी प्रमुख आणि गृहसचिव उपस्थित होते. बैठकीनंतर गृहमंत्री श्रीनगरला रवाना झाले. तत्पुर्वी, त्यांनी पंतप्रधान मोदींना घटनेची सविस्तर माहिती दिली. गृहमंत्री शाह म्हणाले की, त्यांनी पंतप्रधान मोदींना या घटनेची माहिती दिली आहे. शिवाय, हल्ल्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे मला प्रचंड दुःख झाले आहे. मृतांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत. या भयानक हल्ल्यात सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही. आम्ही दोषींवर कठोर कारवाई करू, असा निर्धार गृहमंत्र्यांनी व्यक्त केला.
सरकारने पोकळ दावे...राहुल गांधी काय म्हणालेया भ्याड दहशतवादी हल्ल्याबद्दल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दुःख व्यक्त केले. त्यांनी सोशल मीडिया हँडल X वर लिहिले की, 'पहलगाममधील भ्याड दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू आणि अनेक लोक जखमी झाल्याची बातमी अत्यंत निंदनीय आणि हृदयद्रावक आहे. मी शोकाकुल कुटुंबांप्रती माझ्या मनापासून संवेदना व्यक्त करतो आणि जखमींना लवकर बरे होण्याची प्रार्थना करतो. संपूर्ण देश दहशतवादाविरुद्ध एकजूट आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये परिस्थिती सामान्य असल्याचे पोकळ दावे करण्याऐवजी सरकारने आता जबाबदारी घ्यावी आणि ठोस पावले उचलावीत, जेणेकरून भविष्यात अशा क्रूर घटना घडणार नाहीत.