नवी दिल्ली : पाकिस्तानला काश्मीर मुद्दा उपस्थित करण्यात एवढे स्वारस्य होते तर उफा येथील बैठकीतच त्याचा उल्लेख का केला नाही, असा सवाल केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी केला. दुसरीकडे मोदी सरकार परिस्थिती हाताळण्यात अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेस आणि अन्य विरोधी पक्षांनी केला आहे. पाकिस्तानातील प्रसिद्धिमाध्यमांनी मात्र चर्चा रद्द होण्याचे खापर अपेक्षेप्रमाणे भारतावर फोडले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी उफा बैठकीत दहशतवादाच्या मुद्द्यावर चर्चेची सहमती दर्शविली असताना पाकने या बैठकीच्या अजेंड्याला फारकत दिल्याचा आरोप करतानाच राजनाथसिंह यांनी भविष्यातील चर्चा या देशाच्या भूमिकेवरच निर्भर राहणार असल्याचे संकेत दिले आहेत.विदेशमंत्री सुषमा स्वराज यांनी काश्मीर मुद्द्यावर कोणतीही चर्चा होणार नाही असे सांगत अखेरची खीळ घातली. आपण सामोरे जाण्याऐवजी केवळ माघारच घेत आहोत, असे हुरियत कॉन्फरन्सचे नेते मीरवाईज उमर फारूक यांनी सांगितले. चर्चा ऐनवेळी रद्द झाल्याने आमची निराशा झाली. पण दोन्ही देशांनी लवकरच पुन्हा चर्चा करावी, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले.भारत-पाक चर्चा रद्द होणे निराशाजनक आहे, अशी प्रतिक्रिया जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांनी दिली असताना माजी मुख्यमंत्री फारुक अब्दुल्ला यांनी सर्व खापर फुटीरतावादी नेत्यांवर फोडले आहे. ओमर अब्दुल्ला यांनीही नाराजी व्यक्त केली.पाकने बनवले खेळणे। चर्चेचा मुद्दा ज्या पद्धतीने हाताळला ते पाहता मोदी सरकार पाकच्या हातचे खेळणे बनल्याचे दिसून येते, असा आरोप काँग्रेसने केला आहे.पाकची लंगडी भूमिका । चर्चेतून माघार घेतल्यामुळे पाकची दहशतवादासंबंधी भूमिका उघडी पडली आहे, असे सांगत भाजपाने काँग्रेसचा आरोप फेटाळून लावला.(लोकमत न्यूज नेटवर्क)
काश्मीरबाबत आधी का ठरविले नाही?
By admin | Updated: August 24, 2015 01:43 IST