देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी नेहमी चर्चेत असतात. सध्या ते जामनगर ते द्वारका हे १४० किमी अंतर पायी चालत पूर्ण करत आहेत. अनंत अंबानी यांच्या पदयात्रेबाबत अनेक व्हिडिओ, फोटो समोर येतायेत त्यात आता नवीन व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यात या पदयात्रेत अनंत अंबानी यांनी जवळपास २५० कोंबड्या दुप्पट किंमतीत खरेदी केल्याचं दिसून आलं. यामागे नेमकं कारण काय जाणून घेऊया.
कोंबड्या वाचवण्यासाठी उचललं पाऊल
अनंत अंबानी यांची पदयात्रा सुरू असताना वाटेत एक ट्रक २५० कोंबड्या घेऊन जाताना दिसला. पिंजऱ्यात बंद असलेल्या या कोंबड्या कत्तलखान्याच्या दिशेने जात होत्या. हा ट्रक दिसताच अनंत यांनी ते वाहन थांबवण्यास सांगितले. त्यातील कोंबड्या दुप्पट दराने विकत घेतल्या आणि आता या आम्ही पाळू असं ते म्हणाले. अनंत अंबानी यांनी हातात एक कोंबडी घेत पुढे प्रवास करत जय द्वारकाधीश अशी घोषणाही दिली.
एका रिपोर्टनुसार, अनंत अंबानी यांच्या पदयात्रेचा पाचवा दिवस असून ते वडत्रा गावातील विश्वनाथ वेद संस्कृत शाळेत पोहचले. तिथे संस्थापक मगनभाई राज्यगुरू यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. त्यानंतर खंभालियाच्या फुललीया हनुमान मंदिरात दर्शन घेतले. त्यावेळी तिथल्या लोकांनी त्यांचे स्वागत केले. २८ मार्च रोजी अनंत अंबानी यांनी जामनगरच्या मोती खावडी येथून पदयात्रेला सुरुवात केली आहे. १० एप्रिलला अनंत त्यांचा ३० वा वाढदिवस साजरा करणार आहे. द्वारका येथे ते वाढदिवस साजरा करतील. लोकांना त्रास नको म्हणून ते रात्रीच्या वेळेत पदयात्रा काढत आहेत.
मी नेहमी कुठल्याही कामाची सुरुवात करण्याआधी भगवान द्वारकाधीश यांना स्मरण करतो. आपण नेहमी देवावर विश्वास ठेवायला हवा. जिथे देव आहे तिथे चिंता करण्याचं कारण नाही असा संदेश अनंत अंबानी यांनी युवकांना दिला. ते माध्यमांशी बोलत होते. अनंत अंबानी यांनी नुकतेच वन्यजीवांच्या रक्षणासाठी वनतारा प्रोजेक्ट सुरू केला आहे. केंद्र सरकारने त्यांना प्राणी मित्र राष्ट्रीय पुरस्काराने गौरवले आहे. वनतारा येथे २ हजाराहून अधिक प्रजातीचे दीड लाख वन्यजीव आहेत.