हिमाचल प्रदेशातील सिरमौर जिल्ह्यातील एका तरुणीचा विवाह चर्चेचा विषय बनला आहे. सुनीता चौहान असे या तुरुणीचे नाव आहे. या तरुणीने दोन भावांसोबत लग्न केले आहे. सुनीता चौहान ही कुन्हाट गावची रहिवासी असून तिने शिलाई येथील दोन भाऊ प्रदीप आणि कपिल नेगी यांच्यासोबत लग्न केले. हजारो स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. यांनी 'बहुपती' या जुन्या परंपरेचे पालन करत हा विवाह केला, असे सांगण्यात येत आहे. या परंपरेचे नाव आहे 'जोडिदार परंपरा' (Jodidar pratha).
गेल्या १२ जुलै रोजी ट्रान्स-गिरी भागात सुरू झालेल्या या तीन दिवसीय विवाह सोहळ्यात हट्टी संस्कृतीतील विशिष्ट लोकगीते, नृत्य आणि रीतिरिवाज पार पडले. महत्वाचे म्हणजे, हा निर्णय परस्पर संमतीने आणि कोणत्याही दबावाशिवाय घेण्यात आल्याचे सुनीता चौहान हिने म्हटले आहे.
नेमकी काय आहे जोडीदार प्रथा? -या जोडीदार प्रथेंतर्गत, दोन अथवा दोनहून अधिक भाऊ एकाच तरुणीसोबत लग्न करतात. या प्रथेचे ऐतिहासिक मूळ हिमाचल प्रदेशातील ट्रान्स-गिरी प्रदेशातील हट्टी जमातीमध्ये आहेत. ही प्रथा अनेक वेळा महाभारताशीही जोडली जाते, कारण पांचाल राजकन्या द्रौपदीचे लग्न पाच पांडवांसोबत झाले होते, म्हणून या प्रथेला द्रौपदी प्रथा, असेही म्हटले जाते. स्थानिक लोक या प्रथेला उजाला पक्ष किंवा जोडिदारन, असेही म्हणतात.
या प्रथेनुसार, पत्नी परस्पर सहमतीने कुठल्याही वेळी आणि कितीही दिवसांसाठी दोन्ही भावांमध्ये बदलत राहते आणि नंतर, संपूर्ण कुटुंब एकत्रितपणे मुलांचे पालन-पोषण करते. साधारणपणे सर्वात मोठ्या भावाला कायदेशार पिता म्हणून घोषित केले जाते. मात्र, सर्व भाऊ एकत्रितपणे पालन-पोषणाची जबाबदारी पार पाडतात.
एकाच मुलीसोबत का लग्न करतात सख्खे भाऊ? -माध्यमांतील वृत्तांनुसार, जोडीदार प्रथा स्वीकारण्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे, आदिवासी कुटुंबांची वडिलोपार्जित जमिनीचे विभाजन रोखणे. हिमाचल प्रदेशातील डोंगराळ भागात साधारणपणे शेती हाच उत्पन्नाचा एक मुख्य आधार आहे. कुटुंबांचे उत्पन्न याच जमिनीवर अवलंबून असते. अशा परिस्थितीत, सर्व भावांचे एकाच महिलेशी लग्न करून जमीन आणि मालमत्तेचे विभाजन रोखण्याचा प्रयत्न केला जातो. संयुक्त कुटुंबांमध्ये एकता राखण्यासाठी ही प्रथा अवलंबली जाते.