राजेंद्र कुमार, लोकमत न्यूज नेटवर्क, लखनौ : प्रयागराज येथे महाकुंभ मेळ्यात मौनी अमावस्येला बुधवारी चेंगराचेंगरी होऊन ३० जणांचा मृत्यू व ६० जण जखमी झाले. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी एका महिन्यात पूर्ण करावी, असे आदेश उत्तर प्रदेश सरकारने दिले आहेत. चौकशी समितीचे अध्यक्ष व निवृत्त न्यायमूर्ती हर्षकुमार यांनी गुरुवारी ही माहिती दिली. या समितीचे सदस्य प्रयागराजचा दौरा करणार आहेत. चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर दुसऱ्या दिवशी महाकुंभ नगरमध्ये आग लागून काही तंबू भस्मसात झाले. या घटनेत कोणीही जखमी किंवा जीवितहानी झाली नाही.
चेंगराचेंगरीची चौकशी करणाऱ्या समितीमध्ये माजी पोलिस महासंचालक व्ही. के. गुप्ता, निवृत्त आयएएस अधिकारी डी. के. सिंह हेदेखील सदस्य आहेत. हर्षकुमार म्हणाले की, आम्ही या प्रकरणाची चौकशी लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. चेंगराचेंगरीच्या दुसऱ्या दिवशी कुंभमेळ्यातली सेक्टर-२२ मध्ये आग लागून तंबू भस्मसात झाले. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.
प्रयागराजमध्ये वाहनांना प्रवेशबंदीमहाकुंभातील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर उत्तर प्रदेश सरकारने कोट्यवधी भाविकांच्या गर्दीच्या व्यवस्थापनात अधिक सतर्क झाले आहे. गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत ५५.११ लाख भाविकांनी स्नान केले होते. मौनी अमावस्येच्या अमृत स्नानासाठी आलेल्या कोट्यवधी भाविकांची गर्दी जोवर कमी होत नाही तोवर प्रयागराज शहरात वाहनांना प्रवेश देण्यात येणार नाही. मात्र विशिष्ट परिस्थितीत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या परवानगीने काही वाहनांना परवानगी दिली जाऊ शकते.
तीन भाविकांचा वाहन अपघातात मृत्यूमहाकुंभ मेळ्यामध्ये अमृत स्नान करून परतणाऱ्या भाविकांच्या कारला जौनपूर-रायबरेली महामार्गावर गुरुवारी पहाटे एका बसने घडक दिली. त्यात तीन जणांचा मृत्यू झाला तसेच तीन जण जखमी झाले. संजय सिंह (४५), विद्यावती सिंह (४३) बिंदू सिंह (४०) अशी मृतांची नावे आहेत.