Waqf Amendment Bill 2025: १२ तासांच्या चर्चेनंतर मध्यरात्री लोकसभेत वक्फ दुरूस्ती विधेयक मंजूर करण्यात आलं. या विधेयकाच्या बाजूने २८८ मते पडली तर विरोधात २३२ एवढी मतं पडली. सीएए, तिहेरी तलाक रद्द करणे,युसीसी आणि आता वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या मंजुरीनंतर केंद्रातील मोदी सरकारने मोठं यश मिळवलं. विरोधकांनी या विधेयकाला जोरदार विरोध केल्याचे पाहायला मिळाले. मात्र सत्ताधाऱ्यांनीही जोरदार प्रत्युत्तर देत विधेयक मंजूर करवून घेतले. यावेळी संसदीय कामकाज मंत्री आणि अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी जोरदारपणे सरकारची बाजू मांडली. यावेळी त्यांनी विरोधकांना तुमचे १२ वाजले आहेत म्हणत टोला लगावला.
अल्पसंख्याक कल्याण मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी वक्फ दुरुस्ती विधेयक सादर केले. या विधेयकाच्या चर्चेसाठी आठ तासांची वेळ निश्चित करण्यात आली होती. मात्र, नंतर वेळ वाढवण्यात आला आणि या विधेयकावर १२ तासांहून अधिक काळ चर्चा सुरू राहिली. या चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये सभागृहात जोरदार वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. चर्चेनंतर काही वेळा दोन्ही बाजूंकडील खासदार एकत्र हसतानाही दिसले. चर्चेदरम्यान केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी विरोधकांचे १२ वाजले असल्याचे म्हटलं.
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू या विधेयकावरील चर्चेला उत्तर देत होते. यावेळी रात्रीचे १२ वाजले होते. त्यावर कोणीतरी त्यांना १२ वाजल्याचे असल्याचे सांगितले. यावर रिजिजू यांनी लगेचच प्रतिक्रिया दिली आणि घड्याळाकडे पाहत १२ वाजले आमचे नाही तर विरोधकांचे वाजले आहेत असं म्हटलं. यावेळी सत्ताधारी पक्षाचे काही खासदार हसताना दिसले.
दरम्यान, वक्फ दुरुस्ती विधेयकासाठी सरकारला चर्चेचा वेळ वाढवाला लागला. या चर्चेदरम्यान सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी झाली. आणि या विधेयकावर विरोध करणाऱ्या खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सभागृहात विधेयकाची प्रत फाडली. बुधवारी दुपारी १२ वाजता या विधेयकावर चर्चेला सुरुवात झाली होती. रात्री १२ नंतरही चर्चा सुरुच होती. त्यानंतर मध्यरात्री २ वाजता हे विधेयक मंजूर झाले.