Jagdeep Dhankhar: उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून जगदीप धनखड हे सार्वजनिक कार्यक्रमात दिसत नाहीत. ना त्यांच्याशी संपर्क होतोय, ना अधिकृत निवेदन समोर येत आहे, असे सांगत राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी धनखड यांच्या सुरक्षेबाबत शंका उपस्थित केली होती. तसेच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह काँग्रेसनेही माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अचानक गायब होण्याबाबत विविध दावे अन् प्रश्न उपस्थित केले होते. परंतु, विरोधकांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारी एक महत्त्वाची माहिती समोर आल्याचे सांगितले जात आहे.
राजीनामा दिल्यानंतर माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड सार्वजनिकरित्या कुठेच न दिसल्यामुळे विरोधकांकडून सातत्याने त्यांच्या ठावठिकाणासंदर्भात प्रश्न उपस्थित केले जात होते. यावर आम्ही लवकरच जगदीप धनखड यांच्या प्रकृतीविषयीची माहिती सर्वांना देऊ, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले होते. यानंतर आता एका रिपोर्टमधून जगदीप धनखड यांचा पत्ता लागल्याचे म्हटले जात आहे.
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?
जगदीप धनखड यांचा ठावठिकाणा कुठे आहे, याचा अंदाज घेण्याचा प्रयत्न विरोधी पक्षांचे नेते करत असतानाच, माजी उपराष्ट्रपती हे टेबल टेनिस खेळण्यात व योगाभ्यास करण्यात व्यस्त आहेत, असे समजते. जगदीप धनखड सध्या नियमितपणे योगाभ्यास करत आहेत. तसेच घरातील सदस्य, मित्र व उपराष्ट्रपतींच्या एन्क्लेव्हमधील कर्मचाऱ्यांबरोबर टेबल टेनिस खेळतात, अशी माहिती त्यांच्या जवळच्या लोकांनी दिली. याबाबत पीटीआयने वृत्त दिले आहे.
सी.पी. राधाकृष्णन आणि बी. सुदर्शन रेड्डी यांचा अर्ज वैध
९ सप्टेंबर २०२५ रोजी होणाऱ्या उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत रालोआ आणि इंडिया आघाडीमध्येच सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले. रालोआचे सी.पी. राधाकृष्णन आणि इंडिया आघाडीचे बी. सुदर्शन रेड्डी या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. राज्यसभेचे महासचिव आणि निवडणूक अधिकारी पी.सी. मोदी यांनी सांगितले की, उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी ४६ उमेदवारांनी ६८ नामांकन पत्र दाखल केले होते. यातील सी.पी. राधाकृष्णन आणि बुचिरेड्डी सुदर्शन रेड्डी या दोनच उमेदवारांचे अर्ज वैध ठरले. यामुळे निवडणूक रालोआ आणि इंडिया आघाडीमध्येच होणार हे निश्चित झाले. १९ उमेदवारांचे २८ उमेदवारी अर्ज राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक कायदा, १९५२ च्या कलम ५ब (४) नुसार अवैध ठरले. तर २७ उमेदवारांचे ४० नामांकन अर्ज राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती निवडणूक कायदा, १९५२ च्या कलम ५ब (१) (ब) किंवा ५ब (१) (ब) आणि ५क च्या तरतुदींनुसार अवैध ठरविले. यात पुण्याच्या सहजपूर गावचे शेतकरी उमेश म्हेत्रे यांचाही अर्ज अवैध ठरला.
दरम्यान, प्रकृतीचे कारण देत जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपतिपदाचा अचानक राजीनामा दिला. २२ जुलैपासून हे पद रिक्त आहे. जगदीप धनखड यांचा कार्यकाळ ऑगस्ट २०२७ पर्यंत होता. मात्र मुदतीच्या २ वर्ष आधीच ते पदावरून दूर झाले. निवडणूक आयोगानेही उपराष्ट्रपती पदासाठी ९ सप्टेंबरला निवडणूक घेण्याचे जाहीर केले. त्यात जगदीप धनखड यांच्या गायब होण्यावरून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्ली दौऱ्यावर गेलेल्या उद्धव ठाकरे यांनीही जगदीप धनखड कुठे आहेत, असा प्रश्न पत्रकार परिषदेत केला होता.