भोपाळ : पाकिस्तानी नागरिकांनी भारतातून निघून जावे, असा आदेश केंद्र सरकारने पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दिला. त्या पार्श्वभूमीवर भारतीय माता व पाकिस्तानी वडिलांपासून जन्मलेल्या नऊ मुलांच्या बाबतीत काय कारवाई करावी, असा प्रश्न मध्य प्रदेशातील अधिकाऱ्यांसमोर उभा राहिला आहे. देशातील अनेक राज्यांत हा प्रश्न उभा राहिला आहे.
दीर्घकालीन व्हिसासाठी २५ एप्रिल रोजी अर्ज करणाऱ्या पाकिस्तानी नागरिकाच्या प्रकरणावरही तोडगा शोधला जात आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर सांगितले की, भारतीय माता व पाकिस्तानी वडील अशा दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या नऊ मुलांविषयी काय निर्णय घ्यावा याबद्दल केंद्र सरकारचे मत आम्ही मागविले आहे.
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
जवानाच्या पत्नीला पाकला धाडले
केंद्रीय राखीव पोलिस दलातील एका जवानाशी विवाह केलेली पाकिस्तानी महिला मंगळवारी जम्मूमधून मायदेशात रवाना झाली. मीनल खान, असे तिचे नाव असून तिच्या पतीचे नाव मुनीर खान आहे. या दोघांचा ऑनलाइन विवाह झाला होता. आम्हाला कुटुंबासोबत राहण्याची परवानगी द्यावी, अशी तिने सरकारला विनंती केली होती.
‘बेपत्ता’ नेता फोटोवरून वाद
पंतप्रधान संकटाच्या काळात ‘बेपत्ता’ नेता म्हणून दाखविण्याच्या प्रयत्नात असलेल्या पोस्टरवरून भाजपने काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदींचे नाव न घेता त्यांचा एक जुना फोटो दाखवण्यात आला होता. नंतर ही पोस्ट डीलीट करण्यात आली.
काँग्रेस ही ‘लष्कर-ए-पाकिस्तान काँग्रेस’ असून, ते पाकसोबत असल्याचे दाखवायचे असल्याचे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव भाटिया यांनी केली आहे.
पर्यटकांच्या सुरक्षेतील त्रुटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित
पहलगाममधील पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कोणीही का नव्हते? काही व्यक्ती नंतर फसव्या निघतात, त्यांना सरकारने सुरक्षा का दिली? किरण पटेलने अधिकारी असल्याचे भासवत कडक सुरक्षा मिळविली. त्याला सुरक्षा मिळते तर पर्यटकांना का नाही, असा सवाल सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केला.
राहुल गांधी मृताच्या कुटुंबीयांना भेटणार
राहुल गांधी बुधवारी कानपूरला जाणार आहेत. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेले शुभम द्विवेदी यांच्या कुटुंबीयांना ते भेटणार आहेत. रायबरेली आणि अमेठीचा दौरा पूर्ण केल्यानंतर ते कानपूरमध्ये शुभम यांच्या कुटुंबीयांना भेटणार आहेत, असे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांनी सांगितले.
भारतीयांशी विवाह; त्यांची हकालपट्टी करू नका
पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी सरकारला आवाहन केले की, जे पाकिस्तानी नागरिक भारतीय नागरिकांशी विवाह करून अनेक वर्षांपासून इथे राहत आहेत, त्यांना भारतातून हकालपट्टी करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा. आता ज्यांना पाकिस्तानमध्ये पाठविले जात आहे, त्यातील अनेक महिला ३०-४० वर्षांपूर्वी भारतात आल्या. त्यांनी इथे विवाह केला, मुलांना जन्म दिला. आता अचानक त्यांना पुन्हा पाकिस्तानात पाठविणे अयोग्य आहे.
हाशिम मुसा हा पहलगाम हल्ल्याचा सूत्रधार?
पाकिस्तानचा माजी एसएसजी कमांडर हाशिम मुसा हा पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार असल्याचा गुप्तचर यंत्रणांचा कयास आहे. तो सध्या लष्कर-ए-तयबामध्ये सक्रिय आहे. सुरक्षा दले, बिगरकाश्मिरी लोकांवर हल्ले करण्यासाठी त्याला जम्मू काश्मीरमध्ये पाठवण्यात आले. मुसाने ऑक्टोबर २०२४ मध्ये गंदरबलमधील गगनगीर येथे हल्ला केला. यामध्ये अनेक कामगार आणि एका स्थानिक डॉक्टरला आपला जीव गमवावा लागला.