राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हिंदू समाजासंदर्भातील वक्तव्य सध्या चर्चेत आहे. यावरून आता देशातील दोन मोठ्या संतांची प्रतिक्रिया आली आहे. यासंदर्भात बोलताना, "मोहन भागवत यांच्या विधानाशी आपण अजिबात सहमत नाही. मोहन भागवत आमचे 'अनुशासक' नाही, तर आम्ही त्यांचे 'अनुशासक' आहोत, हे मला येथे स्पष्ट करायचे आहे," असे तुलसी पीठाधीश्वर जगद्गुरू रामभद्राचार्य यांनी म्हटले आहे.
तसेच, उत्तराखंडमधील ज्योतिर्मठ पीठाचे शंकरचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनही भागवत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मोहन भागवत हे राजकीयदृष्ट्या सोयीची भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला. अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले, "जेव्हा त्यांना सत्ता हवी होती तेव्हा ते मंदिरांसंदर्भात बोलत होते. आता त्यांच्याकडे सत्ता आहेत, तर ते मंदिरे न शोधण्याचा सल्ला देत आहेत.
"भूतकाळात आक्रमकांनी पाडलेल्या मंदिरांची यादी तयार करण्यात यावी आणि ती..." -अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले, भूतकाळात आक्रमकांनी पाडलेल्या मंदिरांची यादी तयार करण्यात यावी आणि ती हिंदूंना परत करण्यासाठी स्ट्रक्चरचे पुरातत्व सर्वेक्षण केले जावे. भूतकाळात हिंदूंवर प्रचंड अत्याचा झाले आहेत. त्यांची धार्मिक स्थळे नष्ट करण्यात आली. जर आज हिंदू समाज आपल्या मंदिरांचा जीर्णोद्वार आणि संरक्षण करण्यासाठी समोर येत असेल, तर त्यात चूक काय?
काय म्हणाले होते मोहन भागवत? -तत्पूर्वी, सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतीच, नव्या मंदिर-मशीद वादासंदर्भात चिंता व्यक्त केली होती. ते म्हणाले होते की, "राम मंदिर उभे राहिल्यानंतर, आपणही नव्या ठिकानांवर अशाच पद्दतीने मुद्दे उपस्थित करून हिंदूंचे नेते बनू शकतो, असे काहींना वाटते आहे. मात्र, हे स्वीकारार्ह नाही."
भागवत पुढे म्हणाले होते, राम मंदिर उभारले गेले कारण हा सर्व हिंदूंच्या श्रद्धेचा विषय होता. कोणत्याही ठिकानाचा उल्लेख न करता ते म्हणाले, 'रोज नवे प्रकरण (वाद) समोर येत आहे. याला परवानगी कशी देता येईल? हे चालू ठेवू शकत नाही. आपण एकत्र राहू शकतो, हे भारताला दाखवून देण्याची आवश्यकता आहे.