पश्चिम बंगालमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या टीएमसीमध्ये ममता बॅनर्जी आणि त्यांचा पुतण्या अभिषेक यांच्यात मतभेद असल्याच्या बातम्या वारंवार येत असतात. अभिषेक बॅनर्जी यांना पक्षात महत्त्वाचे पद हवे आहे, अशी चर्चाही होत असते. मात्र, ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या पुतण्याला आणखी प्रतीक्षा करावी लागणार असल्याचे संकेत दिले आहेत.
आपल्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसंदर्भात बोलताना त्या म्हणाल्या, "पक्षाचे कार्यकर्ते माझा वाढदिवस साजरा करतात, पण माझी जन्मतारीख निश्चित नाही. प्रमाणपत्रावर माझे वयही ५ वर्षांनी अधिक लिहिले आहे." एवढेच नाही, तर आपण पुढील १० वर्षे सक्रिय आहोत आणि पक्षाची धुरा आपल्याकडेच असेल, असेही ममता बॅनर्जी यांनी एका बैठकीत म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर, दीदींनी आपल्या पुतण्याच्या वाढत्या महत्त्वाकांक्षांना लगाम घालण्यासाठीच, हा निर्णय घेतला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
आपल्या जन्मतारखेसंदर्भात बोलताना ममता म्हणाल्या, "सर्वजण माझा वाढदिवस साजरा करता. मात्र माझी जी जन्मतारीख सांगितली जाते, त्या तारखेला माझा जन्म झालेला नाही. त्या काळात मुले घरातच जन्माला येत असत. मी माझे नाव, वय किंवा आडनाव ठरवले नाही. बरेच लोक मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात, पण ती माझी जन्मतारीख नाही.
माझ्या पालकांनी प्रमाणपत्रावर केवळ एक तारीख लिहिली. आज, ती माझी जन्मतारीख मानली जाते. ममता बॅनर्जी म्हणाल्या, यात काहीही चुकीचे नाही. पूर्वी असे व्हायचे की, लोक वेळेकडे फारसे लक्ष देत नसत. मुले रुग्णालयात नव्हे, तर घरीच जन्माला येत. माझा प्रवेश कसा झाला आणि जन्म तारीख कशी लिहिली गेली, यासंदर्भात मी एका पुस्तकात लिहिले आहे.
प्रत्यक्षात, कागदपत्रांमध्ये ममता बॅनर्जी यांची जन्मतारीख ५ जानेवारी १९५५ अशी लिहिलेली आहे. यानुसार, त्या ७० वर्षांच्या झाल्या आहेत. मात्र, ममता बॅनर्जी यांचा दावा आहे की, त्या ६५ वर्षांच्या आहेत. ममता बॅनर्जी यांच्या या दाव्यांमुळे टीएमसीची धुरा अद्याप त्यांच्याच हाती असले, हे स्पष्ट झाले आहे. यामुळे, त्यांची हीच इच्छा त्यांचा पुतण्या अभिषेक बॅनर्जीसाठी धक्का असल्याचे बोलले जात आहे. कारण, अभिषेक बॅनर्जी आणि ममता बॅनर्जी यांच्या समर्थकांमध्ये अनेकदा मतभेदही दिसून येतात.