West Bengal Election: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजण्यापूर्वी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घोषणांचा पाऊस पाडत मोठी राजकीय खेळी खेळली आहे. रविवारी त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून राज्यातील धार्मिक नेते, सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाचे निर्णय जाहीर केले. या निर्णयांकडे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जींचा मास्टरस्ट्रोक म्हणून पाहिले जात आहे.
पुरोहित आणि मशिदीची सेवा करणाऱ्यांच्या मानधनात मोठी वाढ
ममता बॅनर्जी यांनी पुरोहित (पुजारी) आणि मुअज्जिन (अजान देणारे) यांच्या मानधनात वाढ केली आहे. त्यांना आतापर्यंत मिळत असलेल्या मानधनात ५०० रुपयांची वाढ केली असून, यापुढे त्यांना दरमहा २,००० रुपये मानधन मिळणार आहे. मानधनासाठी आलेल्या सर्व नवीन अर्जांनाही राज्य सरकारने तातडीने मंजुरी दिली आहे. ही घोषणा करताना ममता बॅनर्जी यांनी, आमच्या समुदायाचे आध्यात्मिक जीवन समृद्ध करणाऱ्या या वारशाच्या रक्षकांना योग्य सन्मान आणि आधार मिळावा, यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असं म्हटलं.
सरकारी कर्मचारी आणि शिक्षकांसाठी मोठी भेट
केवळ धार्मिक क्षेत्रातील व्यक्तीच नव्हे, तर सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठीही ममता सरकारने तिजोरी उघडली आहे. राज्य सरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा ROPA 2009 नुसार असलेला थकीत महागाई भत्ता देण्याचे आश्वासन सरकारने पूर्ण केले आहे. हा थकीत डीए मार्च २०२६ पासून कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल. पंचायत, नगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांनाही याचा लाभ मिळणार आहे.
निवडणुकीच्या तोंडावर 'सोशल इंजिनिअरिंग'
बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची राजकीय उष्णता वाढली असताना ममता बॅनर्जी यांनी घेतलेले हे निर्णय अत्यंत महत्त्वाचे आहेत. एका बाजूला पुरोहित आणि मुअज्जिन यांना खुश करून सर्वधर्मीय मतदारांना साद घातली आहे, तर दुसरीकडे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या रोषाला डीएच्या घोषणेने शांत करण्याचा प्रयत्न केला आहे.
थोड्याच वेळात निवडणुकीची घोषणा
दरम्यान, भारतीय निवडणूक आयोग आज रविवार, १५ मार्च रोजी ४ वाजता पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा करणार आहे. यामध्ये पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुडुचेरी या राज्यांचा समावेश आहे. या पाचही राज्यांच्या विधानसभांचा कार्यकाळ १५ जूनपर्यंत संपत आहे. नियमानुसार, कार्यकाळ संपण्यापूर्वी नवीन निवडणुका होणे गरजेचे असते, म्हणून निवडणूक आयोग आज मतदानाचे वेळापत्रक जाहीर करणार आहे.
Web Summary : Ahead of West Bengal elections, Mamata Banerjee hiked stipends for religious leaders and cleared pending DA for government employees, teachers and pensioners. The DA will be credited starting March 2026. Election dates are expected to be announced soon.
Web Summary : पश्चिम बंगाल चुनाव से पहले, ममता बनर्जी ने धार्मिक नेताओं के मानदेय में वृद्धि की और सरकारी कर्मचारियों, शिक्षकों और पेंशनभोगियों के लिए लंबित डीए को मंजूरी दी। डीए मार्च 2026 से जमा किया जाएगा। चुनाव की तारीखें जल्द घोषित होने की उम्मीद है।