पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी २०२६ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला आव्हान दिलं आहे. "मी तुम्हाला परवानगी देत नाही तोपर्यंत तुम्ही मला हरवू शकत नाही" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. झारग्राममधील पंचमाथा मोर येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "मी एक जिवंत सिंहीण आहे आणि कोणीही जखमी करण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा मी 'धोकादायक' होईन. आम्हाला कमी समजू नका. लढा अजून संपलेला नाही."
ममता बॅनर्जी यांनी राजकारणात पूर्वी घडलेल्या घटनांचा उल्लेख केला."माझं डोकं फुटलं होतं, माझं शरीर रक्ताने माखलं होतं. मला भीती वाटत नाही. मी एक जिवंत सिंहीण आहे. मला जखमी करण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा मी धोकादायक होईन. मी परवानगी दिली तरच तुम्ही मला पराभूत करू शकता. जर मला ते नको असेल तर तुम्ही मला पराभूत करू शकत नाही. ममता बॅनर्जींना पराभूत करणं सोपं नाही" असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
निवडणूक आयोगाने दोन निवडणूक नोंदणी अधिकाऱ्यांसह (ईआरओ) चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्याचे निर्देश सरकारला दिल्यानंतर बॅनर्जी यांचं हे विधान आलं. यावर नाराजी व्यक्त करताना त्यांनी आयोगावर राजकीय पक्षपाताचा आरोप केला. "आयोग अमित शाह यांच्या एजंटसारखं वागत आहे. ते अमित शहांच्या हातातील कठपुतलीसारखं वागत आहे. बंगाल हा अपमान सहन करणार नाही. मी माझ्या अधिकाऱ्यांना शिक्षा होऊ देणार नाही. जर तुमच्यात हिंमत असेल तर प्रयत्न करा!" असं म्हणत निशाणा साधला आहे.
तृणमूल काँग्रेसच्या प्रमुखांनी मतदारांना मतदार यादीतील त्यांची नावं तपासण्याचं आणि सतर्क राहण्याचं आवाहनही केलं. "मतदार यादीतील तुमचं नाव हीच तुमची ओळख आहे. आत्ताच नोंदणी करा आणि नंतर पुन्हा तपासा. निवडणुकीच्या दिवशी तुमचं नाव गायब झालेलं हे पाहून हैराण होऊ नका. लोकांना घाबरवण्यासाठी आसाममधून बंगालमध्ये नोटिसा पाठवल्या जात आहेत. त्यांना अजिबात लाज वाटत नाही" असं देखील ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.