दिल्लीतील नागरिकांची चिंता आता आणखी वाढली आहे. पुरामुळे बाधित लोकांना आता पाणीटंचाईला देखील सामोरे जावे लागू शकते. तीन मोठे वॉटर प्लान्ट बंद पडले आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही माहिती देताच दिल्लीकरांचं टेन्शन वाढलं आहे. सोशल मीडियावर याबाबत जोरदार चर्चा रंगली आहे. दिल्लीमध्ये रस्त्यांवर फक्त पाणीच पाणी आहे. हजारो लोकांना याचा फटका बसला आहे. यातच दिल्लीत पाण्याचे संकट निर्माण होणार आहे.
अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्विर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. यमुनेच्या पाण्याची पातळी वाढल्याने वजीराबाद, चंद्रावल आणि ओखला येथील वॉटर ट्रीटमेंट प्लान्ट बंद करावे लागले आहेत. त्यामुळे दिल्लीतील काही भागात पाण्याची समस्या निर्माण होणार आहे. यमुनेचे पाणी कमी होताच आम्ही ते लवकरात लवकर सुरू करण्याचा प्रयत्न करू. जलसंकटामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी मुख्यमंत्री केजरीवाल वजीराबाद जलशुद्धीकरण केंद्रात पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला.
दिल्लीच्या पुरामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. अनेक भागात रस्त्यावर पाणी आले. मेट्रो आणि बससेवेवर देखील परिणाम झाला आहे. मेट्रो धीम्या गतीने धावत होती. स्मशानभूमी बंद करावी लागली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पूरग्रस्त भागातील शाळा बंद करण्याची घोषणा केली आहे. आता दिल्लीत राहणाऱ्या लोकांना जलसंकटाचा सामना करावा लागू शकतो.
वजीराबाद आणि चंद्रावल प्लान्ट बंद झाल्यामुळे जवळपास 40 लाख लोक प्रभावित होऊ शकतात. हे लोक मुख्यतः मध्य आणि जुन्या दिल्लीतील आहेत. हे प्लान्ट बंद पडल्याने इंद्रलोक, शास्त्रीनगर, आझाद मार्केट, न्यू रोहतक रोड, बापा नगर, देव नगर, मॉडेल बस्ती, झंडेवालान एक्स्टेंशन, जामा मशीद, चांदणी चौक, दर्यागंज या भागात पाणीटंचाई निर्माण होणार असल्याचं समजतं. काही रुग्णालयांनाही याचा फटका बसू शकतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.