नवी दिल्ली - वक्फ सुधारणा कायदा संसदेच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यापासून पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबाद इथं हिंसाचार भडकला आहे. केंद्र सरकारकडून देशातील इतर राज्यातही धार्मिक तणावाची शक्यता पाहता सतर्कता बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारला वक्फ सुधारणा अधिनियम २०२५ च्या अधिसूचनेच्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कुठल्याही धार्मिक तणावाची रिपोर्ट मिळाला नाही असं सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
“हल्लेखोर आले, पोलिसांना फोन केला पण...”; मुर्शिदाबाद हिंसाचारातील थरकाप उडवणाऱ्या घटना
मात्र, केंद्रीय गृह मंत्रालयाला कुठलीही जोखीम पत्करायची नाही. केंद्राने बंगालसह अन्य राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये करडी नजर ठेवली आहे. ज्याठिकाणी वक्फ कायद्याविरोधात आंदोलन असेल, धार्मिक हिंसाचार वाढवणारी कृत्ये याचा आढावा घेतला जात आहे. आंदोलन जास्त भडकणार नाही याची काळजी घेण्याची सूचना राज्य सरकारांना देण्यात आली आहे. त्याशिवाय राज्यांनी केंद्रीय सुरक्षा दलाची मागणी केल्यास तात्काळ त्यांना ती सुविधा दिली जाईल जेणेकरून हिंसाचार भडकणार नाही अशीही व्यवस्था करण्यात आली आहे.
एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुर्शिदाबाद येथे पश्चिम बंगालचे डीजीपी राजीव कुमार यांनी तणावग्रस्त भागाचा दौरा केला. कोर्टाच्या निर्देशानुसार पर्यायी केंद्रीय दल तिथे तैनात करण्यात आले आहे. धार्मिक तणाव रोखण्याचा सुरक्षा दलाचा प्रयत्न आहे. अद्याप कुठलीही नवीन हिंसेची घटना घडली नाही असं त्यांनी म्हटलं. शनिवारी केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी पश्चिम बंगालच्या डीजीपींसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे परिस्थितीचा आढावा घेतला. तणावग्रस्त भागात नियंत्रण मिळवण्यासाठी काही पर्याय तयार ठेवले आहेत.
दरम्यान, पश्चिम बंगालमधील तणाव सध्या नियंत्रणात आहे. स्थानिक पातळीवर बॉर्डर सिक्युरिटी फोर्सची मदत घेतली जात आहे. धार्मिक हिंसाचार भडकवल्याप्रकरणी शनिवारपर्यंत १५० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. मुर्शिदाबादमध्ये सध्या ३०० बीएएसएफ जवानांसोबतच राज्य सरकारच्या मागणीवरून केंद्रीय बलाच्या ५ अतिरिक्त तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.