दरभंगा/मुझफ्फरपूर/पाटणा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील विरोधी पक्ष राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) वाभाडे काढत विरोधी पक्षाच्या मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव यांना ‘जंगलराजचे युवराज’ संबोधत १० लाख सरकारी नोकऱ्या देण्याच्या आश्वासनावरून तेजस्वी यादव यांच्यावर हल्लबोल करीत बिहारच्या मतदारांना जंगलराजच्या युवराजांपासून सावध राहण्याचा इशारा दिला आहे.बिहारला आजारी राज्य करण्यास जबाबदार असलेल्यांच्या हाती पुन्हा सत्ता दिल्यास कोरोनासोबत बिहारला दुहेरी मार सोसावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. उत्तर बिहारमधील दरभंगा, मुझफ्फरपूर आणि पाटणा येथील जाहीर प्रचार सभांत पंतप्रधानांनी आपल्या प्रचार सभेतील भाषणाची सुरुवात हिंदुत्वाने करून अयोध्येचा उल्लेख केला.नितीश कुमार विद्यमान आणि भावी मुख्यमंत्री, असे सांगत मोदी म्हणाले की, गेल्या दीड दशकात बिहारने केेलेल्या प्रगतीमुळे लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. पोकळ आश्वासनांची ही वेळ नाही. बिहारला अंधकारातून बाहेर काढून इथवर आणले, अशा अनुभवी लोकांना पुन्हा निवडून देण्याची ही संधी आहे. विरोधी पक्षांवर निशाणा साधताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, स्वत:पुरता विचार करणाऱ्यांचे जनतेशी कसे वर्तन राहिले, हे बिहारची जनता विसरणार नाही. खंडणी दिली तर ठीक, नाही तर अपहरण उद्योगाचा मालकीहक्क त्यांच्याकडे आहेच. तेव्हा त्यांच्यापासून सावध राहावे. राजदच्या पूर्वीच्या राजवटीतील कारभाराचाही त्यांनी समाचार घेतला.
जंगलराजच्या युवराजांपासून मतदारांनी सावध राहावे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे बिहारमध्ये आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 05:07 IST