Leopard Viral Video: फिरत फिरत आलेला बिबट्या अचानक पोलीस ठाण्यात घुसला. पोलीस ठाण्यात आतमधी फिरला आणि नंतर माघारी वळला. ज्यावेळी बिबट्या पोलीस ठाण्यात शिरला त्यावेळी एक पोलीस कर्मचारी आतमध्येच होता. तो बिबट्याच्या नजरेतून सुटला. हा सगळा घटनाक्रम पोलीस ठाण्यातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ही घटना घडली आहे तामिळनाडूमध्ये. बिबट्या ज्या पोलीस ठाण्यात घुसला, ते नीलगिरी जिल्ह्यातील नादूवट्टम पोलीस ठाण्यातील आहे. एका आयएएस अधिकाऱ्याने हा व्हिडीओ शेअर करत माहिती दिली.
बिबट्या पोलीस ठाण्यात, व्हिडीओमध्ये काय?
आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ही घटना सोमवारी (२८ एप्रिल) घडल्याची माहिती आहे.
वाचा >>पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
सुप्रिया साहू यांनी मिश्कील भाषेत म्हटले आहे की, एक बिबट्या नीलगिरी जिल्ह्यातील नादुवट्टम पोलीस ठाण्यात पाहणी करण्यासाठी गेला होता. पोलीस ठाण्यात असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानाला सलाम. त्याने अत्यंत शांतपणे दरवाजा बंद केला आणि लगेच वन विभागाला याची माहिती दिली. यात बिबट्याकडून कुणालाही इजा झाली नाही. बिबट्याही सुखरुप जंगलात परतला, अशी माहिती त्यांनी दिली आहे.
बिबट्या पोलीस ठाण्यात घुसल्यानंतरचा व्हिडीओ
मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस ठाणे असलेल्या या भागात आजूबाजूला जंगलही आहे. त्यामुळे वन्यजीवांचाही वावर परिसरात असतो. पण, यावेळी बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच घुसला. सीसीटीव्ही स्पष्टपणे दिसत आहे की, बिबट्या मुख्य दरवाज्यातून आत आला आणि पोलीस कर्मचारी असलेल्या कार्यालयापर्यंत गेला.
त्यावेळी बाजूच्या कार्यालयात पोलीस कर्मचारी काम करत बसलेला होता. त्यावेळी त्याची नजर बिबट्यावर पडली आणि त्याला धक्काच बसला. तो शांतपणे बसून राहिला. नंतर बिबट्या मागे वळल्यानंतर त्याने हळूच येत दरवाजा लावून घेतला.