लुधियाना : लुधियानाच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांच्या दोन गटांमध्ये सुरू झालेल्या वादाने हिंसक वळण घेतले असून एका कैद्याचा मृत्यू तर अनेकजण जखमी झाले आहेत. कैद्यांनी तुरुंगातील कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यास सुरूवात केल्याने पोलिसांना गोळ्या झाडाव्या लागल्या. गेल्या दोन तासांपासून सुरू असलेल्या दगडफेक आणि फायरिंगमध्ये डीएसपींसह काही पोलिसही जखमी झाले आहेत. डीएसपीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर कैद्यांनी डीएसपीची गाडी जाळली आहे.
पहिल्यांदा कैद्याचा मृत्यू हा पोलिसांनी केलेल्या फायरिंगमध्ये मृत्यू झाल्याचे मानले जात होते. मात्र, परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्यानंतर डीसींनी सांगितले की कैद्याचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे, ज्यामुळे कैदी संतापले होते. या दरम्यान, जेल मंत्री सुखजिंदर रंधावा यांनी एडीजीपी जेल रोहित चौधरी यांच्याकडून पूर्ण घटनाक्रमाची माहिती मागविली आहे. जेल मंत्र्यांनी तुरुंगामध्ये दोन सिलिंडर फुटल्याचेही सांगितले आहे.
मृताची ओळख पटली असून संदीप सूद असे त्याचे नाव आहे. फायरिंगवेळी अनेक कैद्यांनी पळून जाण्याचाही प्रयत्न केला. हे कैदी भिंत चढून पळून जात होते. यापैकी 9 कैदी पळून जाण्यात यशस्वी झाल्याचे समजते. तर चार कैद्यांना पकडण्यात आले आहे.