सुभाष कांबळेअथणी (जि.विजापूर) : कर्नाटकातील चडचण (जि. विजयपूर) येथील स्टेट बँकेतून दरोडेखोरांनी कोट्यवधींची लूट केली. या लुटीच्या ऐवजात हुलजंती (ता. मंगळवेढा) येथील ग्रामस्थ अनवधानाने वाटेकरी झाले. आता सांगली आणि विजयपूरचे पोलिस एकेक रुपयाच्या शोधात फिरत असून, यामुळे ग्रामस्थांच्या झोपा उडाल्या आहेत. पैसे आणि दागिन्यांच्या मोहात ग्रामस्थांनी विकतचे दुखणे ओढवून घेतले आहे.१६ सप्टेंबर २०२५ रोजी पाच दरोडेखोरांच्या टोळीने चडचण शहरातील स्टेट बँकेच्या शाखेत दरोडा टाकून दीड कोटी रुपयांची रोकड आणि तब्बल २० किलो वजनाचे सोन्याचे दागिने लुटून नेले. पोलिस तपास पुढे सरकेल, त्यानुसार हुलजंती गावातील वेगळेच कथानक पुढे येऊ लागले आहे.पाचही दरोडेखोर दरोड्यानंतर हुलजंती गावातून जाताना त्यांचे चारचाकी वाहन एका दुचाकीला धडकले. अपघातामुळे ग्रामस्थांची गर्दी गोळा झाली. त्यावेळी एका दरोडेखाराने पिस्तूल काढून लोकांना धमकावले. गडबडीत दोन बॅगा घेऊन वाहन सोडून निघून गेले. त्यांनी मागे सोडलेल्या गाडीत काही रोकड आणि सोन्याचे दागिने होते. ग्रामस्थांनी हा सारा ऐवज लांबवला.हा ऐवज चडचणच्या दरोड्यातील असल्याची माहिती ग्रामस्थांना नव्हती. याची माहिती मिळताच मंगळवेढा पोलिसांनी ऐवज परत करण्याचे आवाहन केले. ‘सोने आणि रोकड गावातील नेत्यांमार्फत पोलिसांत द्यावे, अन्यथा कायदेशीर कारवाईला तोंड द्यावे लागेल’ असा इशाराही दिला. त्यामुळे घाबरलेल्या दोघांनी अडीच लाख रुपयांची रोकड आणि सोन्याचे लॉकेट गावातील दोन नेत्यांकडे सोपविले. त्यांनी ते पोलिसांत जमा केले. पोलिसांच्या आवाहनानंतर अन्य काही लोकही हळूहळू पुढे येऊ लागले आहेत.पोलिसांच्या तपासादरम्यान गावात एका मोडकळीस आलेल्या घराच्या छतावर बॅग आढळली. बॅगेत ६.६४ किलो सोने आणि ४१ लाख रुपये रोख सापडले. अपघातानंतर पळून जाणाऱ्या दरोडेखोराने अंधारात ही बॅग छतावर लपवल्याचा संशय आहे.
ग्रामस्थांनी घेतले विकतचे दुखणेया प्रकाराचे हुलजंती गावात भीतीचे वातावरण आहे. पैसे आणि सोन्याच्या मोहात आपण दरोड्याच्या गुन्ह्यात अनवधानाने अडकल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून मध्यरात्री काही अनोळखी लोक गावात फिरताना आढळले आहेत. घराच्या छतावर सोने आणि रोख रकमेची बॅग सोडून गेलेले दरोडेखोर, ती परत नेण्यासाठी येत असल्याची शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली. त्यामुळे लोक सायंकाळनंतर बाहेर पडण्यास धजावत नसल्याचे चित्र आहे. पोलिसांनी गावात अधिक सुरक्षा तैनात करण्याची विनंती केली आहे.
हुलजंतीमध्ये सापडलेले दागिने, रोकड आणि त्या अनुषंगाने अधिक तपास सुरू आहे.- लक्ष्मण निंबर्गी, पोलिस अधीक्षक, विजयपूर.