आम आदमी पार्टीने राघव चड्ढा यांना राज्यसभेतील पक्षाच्या उपनेतेपदावरून हटवलं आहे. या निर्णयानंतर पक्षाने आणि अनेक नेत्यांनी राघव चड्ढा यांच्यावर गंभीर आरोप केले. आता राघव चड्ढा यांनी 'धुरंधर' चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग “घायल हूं, इसलिए घातक हूं” वापरून आम आदमी पार्टीच्या आरोपांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
राघव चड्ढा यांनी 'X' वर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी आपल्यावर केलेले सर्व आरोप 'खोटे' असल्याचं म्हटलं आहे. तसेच, आपल्याविरुद्ध कट रचला जात असल्याचा दावाही त्यांनी केला. राघव म्हणाले की, "सुरुवातीला मी यावर बोलणार नव्हतो. पण नंतर मला जाणीव झाली की, जर एक खोटं शंभर वेळा बोललं गेलं, तर काही लोक त्याला सत्य मानू लागतात. म्हणूनच मी उत्तर देण्याचा निर्णय घेतला."
AAP च्या आरोपांवर स्पष्टीकरण
आप खासदाराने व्हिडिओमध्ये सांगितलं की, "आम आदमी पार्टीने तीन आरोप करत असं म्हटलं की, या कारणांमुळे आम्ही राघव चड्ढा यांना संसदेत बोलण्याची संधी देणार नाही. संसदेत बोलण्यावर बंदी घालण्यासाठी त्यांनी माझ्या तीन चुका सांगितल्या. मला या तिन्ही आरोपांवर एक एक करून सविस्तर बोलायचं आहे."
“हे पूर्णपणे खोटं आहे”
राघव यांच्यावर आरोप आहे की, जेव्हा विरोधक संसदेतून वॉकआऊट करतात, तेव्हा ते आपल्या जागेवरच बसून राहतात. यावर ते म्हणाले, "हे पूर्णपणे खोटं आहे. मी आव्हान देतो की, अशी एकही घटना दाखवा जेव्हा विरोधकांनी वॉकआऊट केलं असेल आणि मी त्यांच्यासोबत गेलो नसेल. संसदेत सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, ते तपासा म्हणजे सत्य समोर येईल."
“सर्व दोष माझ्यावरच का टाकला जात आहे?"
निवडणूक आयुक्तांवरील महाभियोग प्रस्तावावर स्वाक्षरी नाकारणं. या आरोपाचं खंडन करताना राघव म्हणाले की, आम आदमी पार्टीच्या कोणत्याही नेत्याने त्यांना या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यास सांगितलं नव्हतं. "पक्षाचे राज्यसभेत १० खासदार आहेत, त्यापैकी ६ ते ७ खासदारांनी स्वतः या प्रस्तावावर स्वाक्षरी केलेली नाही, मग यात माझी काय चूक? सर्व दोष माझ्यावरच का टाकला जात आहे?"
"समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
“मी आवाज उठवला आहे”
राघव चड्ढा यांनी सांगितलं की, त्यांच्यावर असा आरोप झाला की ते घाबरले आहेत आणि बिनकामाचे मुद्दे मांडतात. यावर ते म्हणाले, "मी संसदेत गोंधळ घालण्यासाठी, ओरडण्यासाठी किंवा माईक तोडण्यासाठी गेलो नाही. मी तिथे जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी गेलो आहे. मी जीएसटी, इन्कम टॅक्स, पंजाबचं पाणी, दिल्लीचं प्रदूषण, सरकारी शाळा, आरोग्य सुविधा आणि रेल्वे प्रवाशांच्या समस्या मांडल्या आहेत. इतकंच नाही तर ज्या मुद्द्यावर लोक बोलायला घाबरतात, अशा 'मासिक पाळी आरोग्य' या विषयावरही मी आवाज उठवला आहे."
'धुरंधर २' च्या डायलॉगने उत्तर
राघव चड्ढा पुढे म्हणाले की, कोणालाही शंका असल्यास त्यांनी त्यांच्या ४ वर्षांचा संसदीय रेकॉर्ड तपासावा. ते संसदेत प्रभाव निर्माण करण्यासाठी गेले आहेत, गोंधळ घालण्यासाठी नाही. शेवटी त्यांनी इशारा देताना म्हटलं की, "जे लोक आज माझ्यावर खोटे आरोप करत आहेत, त्यांचं प्रत्येक खोटं उघड केलं जाईल. कारण मी आता जखमी आहे, म्हणूनच घातक आहे."
Web Summary : Raghav Chadha denies AAP's accusations of misconduct, calling them false. He claims a conspiracy against him and defends his parliamentary record, highlighting his focus on public issues like GST and healthcare. He asserts he is now 'hurt, therefore dangerous,' vowing to expose lies.
Web Summary : राघव चड्ढा ने आप के दुर्व्यवहार के आरोपों का खंडन करते हुए उन्हें झूठा बताया। उन्होंने अपने खिलाफ साजिश का दावा किया और जीएसटी और स्वास्थ्य सेवा जैसे सार्वजनिक मुद्दों पर ध्यान केंद्रित करते हुए अपने संसदीय रिकॉर्ड का बचाव किया। उन्होंने कहा कि वह अब 'घायल हैं, इसलिए घातक हैं' और झूठ का पर्दाफाश करने की कसम खाई।