Viral Video: नेहमीप्रमाणे सकाळी ते फिरायला गेले. फिरून आल्यानंतर घरासमोरील रस्त्यावर उभे होते. अंगणात उभे असतानाच अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि काही क्षणातच मृत्यूने त्यांच्यावर काळाने झडप घातली. एका २८ वर्षीय तरुण नेत्याचा ह्रदयविकाराने मृत्यू झाला. ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर अमित चौधरी खाली पडून मृत्यू झाल्याची घटना कॅमेऱ्यात कैद झाली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
ही घटना उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील खुर्जा विभागात मदनपूर गावात घडली. अमित चौधरी हे राष्ट्रीय लोकदल पक्षाचे नेते आहेत.
मॉर्निंग वॉकवरून आले अन्...
घराबाहेर लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे. अमित चौधरी हे मॉर्निंग वॉक करून आले होते. ते अंगणात उभे होते. ते आजूबाजूला बघत होते. त्यांच्याजवळून एक व्यक्ती बोलून गेला.
व्हिडीओ बघा
त्या व्यक्तीच्या खांद्यावर मस्करीत हात मारताना अमित चौधरी दिसत आहे. तो व्यक्ती निघून गेल्यानंतर अमित चौधरींना अस्वस्थ वाटू लागल्याचे दिसत आहे. पाठीमागे असलेल्या भिंतीचा आधार घेण्यासाठी वळल्यानंतर काही क्षणातच त्यांचा तोल जातो आणि ते खाली कोसळतात.
ते खाली पडल्यानंतर काही वेळाने एक व्यक्ती धावून येतो. तो त्यांना उठवण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर एक-दोन लोक येतात. पण, तोपर्यंत अमित चौधरी हे मयत झाल्याचे दिसत आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, या घटनेने पुन्हा एकदा तरुण वयात ह्रदयविकारामुळे मृत्यू होण्याचा विषय चर्चेत आला आहे.