नवी दिल्ली - उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी एनडीएचे उमेदवार सी.पी राधाकृष्णन विजयी झाले. राधाकृष्णन यांना ४५२ मते मिळाली तर विरोधी उमेदवार सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली. या निवडणुकीत इंडिया आघाडीची काही मते फुटल्याचा दावा भाजपाकडून केला जात आहे. त्यातच टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी या निवडणुकीच्या निकालावरून भाजपावर गंभीर आरोप केला आहे. भाजपाने प्रत्येक खासदाराला १४ ते १५ कोटी देऊन मत खरेदी केले असं अभिषेक बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.
कोलकाता येथे पत्रकारांशी बोलताना टीएमसी खासदार अभिषेक बॅनर्जी म्हणाले की, निकालानंतर मी काही लोकांशी संवाद साधला. तेव्हा भाजपाने मत खरेदी करण्यासाठी काहींना १५ ते २० कोटी ऑफर दिली होती. निवडून आलेले लोकप्रतिनिधी जनतेचा विश्वास आणि त्यांच्या भावना विकण्याचं काम करत आहेत. परंतु भाजपा लोकप्रतिनिधींना खरेदी करू शकते, मात्र जनतेला नाही असं त्यांनी सांगितले.
तसेच आमच्या २८ लोकसभा आणि २३ राज्यसभा असे मिळून सर्व ४१ खासदारांनी बी. सुदर्शन रेड्डी यांना मतदान केले. हे मतदान गुप्त होते, त्यामुळे क्रॉस व्होटिंग झाली की विरोधकांची मते बाद केली हे सांगणे कठीण आहे. सर्व अंदाज वर्तवले जात आहेत. विरोधी पक्षांनी मतदान केले आणि सर्व १५ मते विरोधकांची असतील तर क्रॉस व्होटिंग बोलू शकत नाही. परंतु दोन्ही बाजूने विचार केल्यास ५-६ लोकांनी क्रॉस व्होटिंग केले असावे असंही अभिषेक बॅनर्जी यांनी म्हटलं.
१४ खासदार मतदानापासून दूर, १५ मते ठरली बाद
उपराष्ट्रपती निवडणुकीत भाजपा नेतृत्वातील एनडीएचे उमेदवार सी.पी राधाकृष्णन यांनी इंडिया आघाडीचे बी. सुदर्शन रेड्डी यांना हरवले. एकूण ७८७ खासदारांपैकी एनडीएला ४५२ मते तर रेड्डी यांना ३०० मते मिळाली. या निवडणुकीत १४ खासदारांनी मतदानापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला तर १५ मते निवडणुकीत बाद ठरली होती.