लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : सणासुदीच्या काळात महागाई वाढेल, असा तज्ज्ञांचा अंदाज खोटा ठरला असून, घाऊक क्षेत्रातील महागाई सलग सहाव्या महिन्यात घसरली असून, सप्टेंबरमध्ये ती शून्याच्या खाली (-) ०.२६ टक्क्यांवर राहिली आहे. खाद्य वस्तूंच्या किमती घसरल्यामुळे महागाईचा दर उणेच राहिला आहे.
घाऊक किंमत निर्देशांकावर (डब्ल्यूपीआय) आधारित महागाई एप्रिलपासून सातत्याने शून्याच्या खाली आहे. ऑगस्टमध्ये ती उणे (-) ०.५२ टक्क्यांवर होती. सप्टेंबर २०२२ मध्ये घाऊक किंमत निर्देशांक १०.५५ टक्क्यांवर होता. खाद्य वस्तूंची महागाई मागील २ महिन्यांपासून २ अंकी होती. सप्टेंबरमध्ये मात्र ती घसरून ३.३५ टक्के झाली. ऑगस्टमध्ये ती १०.६० टक्के होती.
इंधन व वीज क्षेत्रातील महागाईचा दर सप्टेंबरमध्ये शून्याच्या खाली (-) ३.३५ टक्के राहिला. ऑगस्टमध्ये तो शून्याच्या खाली (-) ६.०३ टक्के होता. वस्तू उत्पादन क्षेत्राची महागाई सप्टेंबरमध्ये शून्याच्या खाली (-) १.३४ टक्के राहिली. ऑगस्टमध्ये ती शून्याच्या खाली (-) २.३७ टक्के होती.
राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालयाने मागील सप्ताहात जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सप्टेंबरमध्ये किरकोळ क्षेत्रातील महागाई वार्षिक आधारावर घटून ३ महिन्यांच्या नीचांकावर म्हणजेच ५.०२ टक्के झाली. भाज्या आणि इंधनाच्या दरात घसरण झाल्यामुळे किरकोळ महागाईत घट झाल्याचे आकडेवारीत म्हटले आहे.