ऑनलाइन टीम
वाराणसी, दि. ९ - भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना वाराणसीतील ५६ टक्के मतदार मत देतील अशी माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे. मोदींच्या विरोधात निवडणूक लढवणारे काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांना १५ टक्के तर आपचे अरविंद केजरीवाल यांच्या पारड्यात फक्त १० टक्के मत पडतील असा अंदाजही या सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे.
एका इंग्रजी वृत्तपत्राने वाराणसीतील मतदारांचे मतदारांचे मत जाणून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केले आहे. मोदींनी वाराणसीतून निवडणूक लढवल्याने पूर्व उत्तरप्रदेश व अन्य हिंदी भाषिक राज्यांमध्ये भाजपला फायदा होईल का असा प्रश्न मतदारांना विचारण्यात आला. यातील ५१ टक्के मतदारांनी होकारार्थी उत्तर दिले आहे.
वाराणसीतील जातीय समीकरणावरही या सर्वेक्षणात काही निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. वाराणसीतील ७७ टक्के ब्राह्मण, ८० टक्के राजपूत, ८१ टक्के वैश्य, ६७ टक्के भूमीहार, ७६ टक्के अन्य उच्च जातीय समाज, ५३ टक्के दलित, ६५ टक्के कुमरी समाजाने मोदींनाच पसंती दर्शवली आहे.