Vande Bharat Train On Bullet Train Track: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अतिशय महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्प अनेक कारणांवरून चर्चेत असतो. बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामांनी गेल्या काही वर्षांत वेग घेतला असला, तरी प्रत्यक्षात पहिली ट्रेन धावण्यासाठी भारतीय प्रवाशांना आणखी काही वर्षांची वाट पाहावी लागणार आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी स्वतंत्र ट्रॅक, सिग्नल यंत्रणा, पायाभूत सुविधा उभारण्याचे काम वेगाने सुरू असले तरी या प्रकल्पाला खूप विलंब झाला आहे. परंतु, यातच आता बुलेट ट्रेनच्या ट्रॅकवर स्वदेशी बनावटीची वंदे भारत ट्रेन चालवण्याचा विचार भारतीय रेल्वेकडून केला जात असल्याचे सांगितले जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वेने याबाबत नवीन योजना आखली आहे. जपानी बनावटीची बुलेट ट्रेन येईपर्यंत वंदे भारत ट्रेन हाय-स्पीड कॉरिडॉरवर धावेल. जपानी बुलेट ट्रेनच्या खरेदी करारात विलंब झाल्यामुळे आता या ट्रॅकवर वंदे भारत ट्रेन चालवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. वंदे भारत ट्रेन ही बुलेट ट्रेनसाठी तयार करण्यात आलेल्या ट्रॅकवर जास्तीत जास्त २८० किमी प्रतितास वेगाने चालवता येतील. जपानहून बुलेट ट्रेन भारतात येईपर्यंत वंदे भारत ट्रेन ही बुलेट ट्रेन ट्रॅकवर कमाल वेगाने धावेल, असे म्हटले जात आहे.
२०२६ रोजी धावणार होती पहिली जपानी बनावटीची बुलेट ट्रेन, पण आता...
जपानी बनावटीच्या बुलेट ट्रेनसाठी एक वेगळी टाइमलाइन तयार करण्यात आली होती. ही ट्रेन ऑगस्ट २०२६ पर्यंत सुरत-बिलिमोरा विभागात सुरू होईल, अशी योजना होती. परंतु सध्याच्या कामाची गती पाहता, ही योजना २०३० पूर्वी कार्यान्वित होण्याची शक्यता नाही. या प्रकल्पाची पायाभरणी सप्टेंबर २०१७ मध्ये करण्यात आली होती. संपूर्ण कॉरिडॉरमध्ये या विशेष हाय-स्पीड ट्रेन्स पूर्णपणे सुरू करण्यासाठी अधिक वेळ लागेल, असे सांगितले जात आहे. तसेच २०२७ पर्यंत कॉरिडॉरवर २८० किमी ताशी वेगाने धावेल, अशी वंदे भारत ट्रेन सक्षम करण्यासाठी पायाभूत सुविधांचा तयार करण्यात आल्या आहेत. वंदे भारत ट्रेन ही भारतातील स्वदेशी हाय-स्पीड ट्रेन आहे. बुलेट ट्रेन ट्रॅकवर जपानी बनावटीच्या बुलेट ट्रेन सुरू होईपर्यंत हे एक अंतरिम उपाय म्हणून वंदे भारत ट्रेन चालवण्याच्या दिशेने भारतीय रेल्वेने तयारी सुरू केल्याची माहिती देण्यात आली आहे.
दरम्यान, २०३० पर्यंत जपानी बनावटीची बुलेट ट्रेन खरेदी करण्याबाबत रेल्वेचे अधिकारी आशावादी आहेत. तोपर्यंत वंदे भारत ट्रेनचा अंतरिम वापर प्रवाशांच्या गरजा पुरेशा प्रमाणात पूर्ण करू शकेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. रेल्वे मंत्रालयाने अलीकडेच युरोपियन सिग्नलिंग सिस्टमसाठी निविदा मागवल्या आहेत, ज्यामुळे धोरणात बदल झाल्याचे दिसून येत आहे. जपानी बुलेट ट्रेनच्या खरेदीला अंतिम स्वरूप देण्यास होत असलेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर हा बदल करण्यात आल्याचे सांगितले जात असून, आता २०३३ पर्यंत बुलेट ट्रेन सुरू होण्याची अपेक्षा आहे. याबाबत टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.