उत्तराखंडमध्ये पावसाने कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे सहस्त्रधारा येथे ढगफुटी झाली. अचानक आलेल्या पुरात अनेक दुकानं आणि घरं वाहून गेली आहेत. दोन लोक बेपत्ता आहेत, ज्यांचा शोध घेतला जात आहे. पहाटे ५ वाजता ढगफुटी झाली. एसडीआरएफ, एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन वेगाने बचावकार्य करत आहेत.
आपत्ती व्यवस्थापन सचिव विनोद कुमार सुमन यांनी दिलेल्या माहितीनुसार, "डेहरादून आणि मसूरीतील सहस्त्रधारा आणि मालदेवता येथे नुकसान झालं आहे. डेहरादूनमध्ये दोन ते तीन लोक बेपत्ता असल्याची माहिती मिळत आहे. मसूरीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बातमी आहे, ज्याची पुष्टी होत आहे. बाधित भागात मदत आणि बचावकार्यात पथकं गुंतलेली आहेत, तर ३०० ते ४०० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे."
डेहरादूनमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे परिस्थिती सतत बिकट होत आहे. डेहरादूनजवळील पुलाचा काही भागही मुसळधार पावसात वाहून गेला. देहरादून-हरिद्वार महामार्गावरील फन व्हॅलीजवळ ही विध्वंस दिसून आला. मालदेवताजवळ सौंग नदीचं भयंकर रूप दिसून येत आहे. नदी पूल तोडून अनियंत्रित वेगाने वाहत आहे. सर्व शाळांना सुट्टी देण्यात आली आहे.
ऋषिकेशमध्येही चंद्रभागा नदीला पूर आला आहे. पाणी महामार्गावर पोहोचले आहे. अनेक वाहनं आणि लोक नदीच्या प्रवाहात अडकले आहेत. एसडीआरएफ पथकाने चंद्रभागा नदीतून तीन जणांना वाचवले आहे. तपकेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात १-२ फूट ढिगारा साचला आहे. मंदिर परिसरात मोठं नुकसान झालं आहे. आयटी पार्क डेहरादूनजवळील रस्त्यांवर वाहनं तरंगताना दिसली. दोन जण बेपत्ता असल्याची माहिती आहे, ज्यांचा शोध सुरू आहे.