ऑनलाइन टीम
लखनौ, दि. २७ - उत्तरप्रदेशमध्ये दंगल घडवून राज्यात अशांतता निर्माण करण्याचे षडयंत्र नागपूरमधून रचले जात आहे असा आरोप समाजवादी पक्षाचे नेते व उत्तरप्रदेशमधील अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री आझम खान यांनी केला आहे. नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असून त्या उद्देशानेच खान यांनी ही टीका केली आहे.
सहारनपूर येथे जमिनीच्या वादातून दोन समाजात दंगल भडकली होती. यात ३ जण ठार झाले असून २२ हून अधिक जण जखमी झाले आहेत. रविवारी या भागातील दंगल आटोक्यात आणण्यात पोलिस यंत्रणेला यश आले असले तरी आता राजकीय पक्षांनी दंगलीचे राजकारण सुरु केले आहे. भाजपने दंगलीसाठी सत्ताधारी समाजवादी पक्षाला जबाबदार ठरवले होते. समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी भाजपला प्रत्यूत्तर देत संघावरही निशाणा साधला आहे. समाजवादी पक्षाची सत्ता असलेल्या उत्तरप्रदेशमध्ये जनतेसाठी राबवलेल्या उपयुक्त धोरण आणि सरकारचे अस्तित्व धोक्यात आणण्यासाठी नागपूरमध्ये संशोधन सुरु आहे. आझम यांच्या टीकेचा रोख नागपूरमधील संघ मुख्यालयाच्या दिशेने होता. दंगलीसाठी संघाला दोषी ठरवतानाच खान यांनी मोदी यांच्यावरही टीका केली आहे.