ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 15 - उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत महाविजय मिळवल्यानंतर सध्या भारतीय जनता पक्षामध्ये मुख्यमंत्रीपदावरून काथ्याकुट सुरू आहे. विधानसभेत प्रचंड संख्याबळ मिळाल्याने मुख्यमंत्रीपदाच्या दावेदारांची संख्याही वाढली आहे. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी उत्तर प्रदेश हे महत्त्वाचे राज्य ठरणार असल्याने ही निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच भाजपा नेतृत्वाकडून उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्याची निवड होणार आहे. तसेच मणिपूर आणि गोव्यात बहुमत चाचणी झाल्यानंतर याबाबत अंतिम निर्णय होणार आहे.
सध्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत भाजपाकडून अनेक नावे चर्चेत आहेत. मात्र चांगल्या व्यक्तिमत्त्वाकडे नेतृत्वाची धुरा सोपविण्याबाबत पक्षनेतृत्व विचार करत आहे. मुख्यमंत्री निवडताना जातीचे गणित आणि वय यांचा समन्वय साधण्यात येईल. तसेच नवा मुख्यमंत्री हा युवकांना आकर्षित करू शकेल आणि विकासाचा दृष्टिकोन पुढे घेऊन जाईल, याची खबरदारी घेण्यात येणार आहे.
"325 आमदारांचे दणदणीत संख्याबळ मिळवल्यानंतर विशिष्ट जातीचाच मुख्यमंत्री देण्याचा दबाव भाजपावर नसेल. 2019 ची निवडून डोळ्यांसमोर ठेवून विकासाचा अजेंडा पुढे नेईल, असाच चेहरा मुख्यमंत्री म्हणून दिला जाईल," असा अंदाज राजकीय निरीक्षकांकडून वर्तवण्यात येत आहे.
सध्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत रेल्वे राज्यमंत्री मनोज सिन्हा, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग, भाजपाचे उत्तर प्रदेश अध्यक्ष केशव प्रसाद मौर्य आणि प्रखर हिंदुत्ववादी नेते योगी आदित्यनाथ यांची नावे चर्चेत आहेत.