बलरामपूर: कोरोनाविरोधातील लढाईतील एकजूट दाखवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी (काल) रात्री ९ वाजता ९ मिनिटं दिवा, मेणबत्ती, टॉर्च पेटवण्याचं आवाहन केलं होतं. मोदींच्या या आवाहनाला देशानं उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. त्याचवेळी उत्तर प्रदेशातील बलरामपूरच्या भाजपा जिल्हाध्यक्ष मंजू तिवारींनी हवेत गोळीबार केला. मंजू तिवारींनी रात्री ९ वाजता दिवा लावल्यानंतर त्यांच्या परवाना असलेल्या बंदुकीतून काही राऊंड्स फायर केल्या.संपूर्ण देश कोरोनाविरोधातील संघर्षात एकजूट दाखवत असताना भाजपा महिला जिल्हाध्यक्ष मंजू तिवारी बंदुकीतून गोळीबार करत होत्या. विशेष म्हणजे त्यांनी स्वत: हा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला. 'दिवा पेटवल्यानंतर कोरोनाला पळवताना' असं शीर्षक त्यांनी व्हिडीओला दिलं. त्यानंतर तो व्हायरल झाला. यामध्ये त्या बंदुकीतून गोळीबार करताना स्पष्ट दिसत आहेत. आनंदाच्या भरात गोळीबार करणं हा कायद्यानं गुन्हा आहे. त्यामुळे आता मंजू तिवारी यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे.
CoronaVirus: गो कोरोना गो; देश दिवे लावत असताना भाजपाच्या जिल्हाध्यक्षांचा हवेत गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2020 12:04 IST