US Deported Illegal Indian Immigrants Third Batch : अमेरिकन हवाई दलाचे आणखी एक विमान RCH869 रविवारी भारतात पोहोचले. विमान अमृतसर विमानतळावर उतरले. या विमानात ११२ बेकायदेशीर स्थलांतरित होते, ज्यांना अमेरिकेतून हाकलून लावण्यात आले आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने बेकायदेशीर स्थलांतरावर कारवाईचा एक भाग म्हणून हद्दपार केलेली ही अशा भारतीयांची तिसरी तुकडी आहे. सूत्रांनी आधी सांगितले होते की हे विमान १५७ बेकायदेशीर स्थलांतरितांसह भारतात येणार आहे, परंतु अद्ययावत यादीत ही संख्या ११२ इतकी होती.
अलीकडेच, शनिवारी रात्री उशिरा ११६ बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना घेऊन जाणारे आणखी एक अमेरिकन विमान अमृतसर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले. सी-१७ विमान रात्री १० ऐवजी ११.३५ वाजता विमानतळावर उतरले. या दुसऱ्या तुकडीमध्ये ११९ स्थलांतरित असतील असे आधी सांगण्यात आले होते, परंतु प्रवाशांच्या अद्ययावत यादीनुसार दुसऱ्या तुकडीतील निर्वासित लोकांची संख्या ११६ होती. बेकायदेशीर स्थलांतरितांच्या दुसऱ्या तुकडीत पंजाबमधील ६५, हरियाणातील ३३, गुजरातमधील आठ, उत्तर प्रदेश, गोवा, महाराष्ट्र आणि राजस्थानमधील प्रत्येकी दोन आणि हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीरमधील प्रत्येकी एक जण होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यापैकी बहुतेक जण १८ ते ३० वयोगटातील होते.
५ फेब्रुवारी रोजी १०४ बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांना घेऊन जाणारे अमेरिकन लष्करी विमान अमृतसर विमानतळावर उतरले. यापैकी प्रत्येकी ३३ जण हरियाणा आणि गुजरातमधील होते, तर ३० जण पंजाबमधील होते. परदेशातून हद्दपार केलेल्या आणि बेकायदेशीर स्थलांतरित ठरवण्यात आलेल्या भारतीय स्थलांतरितांच्या दुसऱ्या तुकडीच्या कुटुंबातील अनेकांना या गोष्टीचा धक्का बसला. त्यापैकी अनेकांनी असा दावा केला की आपल्या कुटुंबातील सदस्याला अमेरिकेत पाठवण्यासाठी जे पैसे उभे करायचे होते, त्यासाठी त्यांनी त्यांची शेती आणि गुरेढोरे गहाण ठेवली होती.
अमेरिकेतून भारतीयांना का परत पाठवले जात आहे?
ट्रम्प प्रशासनाने देशातून बेकायदेशीर स्थलांतरितांना हाकलून लावण्यासाठी स्वीकारलेल्या धोरणांनुसार भारतीय बेकायदेशीर स्थलांतरितांना अमेरिकेतून हाकलून लावले जात आहे. यामध्ये बेकायदेशीरपणे देशात प्रवेश करणारे किंवा त्यांच्या व्हिसाच्या कालावधीपेक्षा जास्त काळ देशात राहणारे लोक समाविष्ट आहेत. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अलिकडेच अमेरिकेचा दौरा केला होता, जिथे त्यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेऊन इमिग्रेशनसह प्रमुख द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा केली. संयुक्त पत्रकार परिषदेत, पंतप्रधान मोदींनी भारतीय नागरिकांना परत पाठवण्याच्या भारताच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. तसेच असुरक्षित स्थलांतरितांचे शोषण करणाऱ्या मानवी तस्करी नेटवर्क्सना तोंड देण्याची गरज देखील अधोरेखित केली.