नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे बुधवारी विरोधक जास्तच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. शाहांच्या वक्तव्यानंतर काँग्रेससह विरोधी पक्षांनी गृहमंत्र्यांनी माफी मागावी, अशी मागणी करीत जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकांनी गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचीदेखील मागणी केली. दरम्यान, सत्ताधारी पक्षाने डॉ. आंबेडकर यांचा वारंवार अवमान केल्याचा दावा करीत विरोधकांवर प्रहार केला. यादरम्यान सुरुवातीला लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज काही वेळासाठी स्थगित करण्यात आले. दुपारी दोन वाजेनंतर परत कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर दोन्ही सभागृहांचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
संविधानावरील चर्चेदरम्यान मंगळवारी राज्यसभेत बोलताना गृहमंत्री अमित शाहांनी आंबेडकरांबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद बुधवारी दोन्ही सभागृहांत उमटले. सकाळी ११ वाजता लोकसभेचे कामकाज सुरू झाल्याबरोबर विरोधी पक्षांनी 'जय भीम'च्या घोषणा द्यायला सुरुवात केली.
विशेषाधिकार उल्लंघनाची नोटीस
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वक्तव्य केल्याबद्दल तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन यांनी राज्यसभेत गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात विशेषाधिकार उल्लंघनाची नोटीस दिल्याचा दावा सूत्रांनी केला. प्रक्रिया व कार्यपद्धतीच्या नियमावलीतील नियम १८७ या अंतर्गत ही नोटीस पाठवली आहे.
लोकसभा दिवसभर स्थगित
या घोषणाबाजीदरम्यान संसदीय कार्य राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी काँग्रेसला लक्ष्य करीत या पक्षाने नेहमीच बाबासाहेबांचा अवमान केल्याचा आरोप केला. बाबासाहेबांचा निवडणुकीत पराभव करणारा हा पक्ष असल्याचा दावा करीत मेघवाल यांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली. गोंधळ जास्तच वाढत गेल्यानंतर ११ वाजून दोन मिनिटांनी दुपारी दोन वाजेपर्यंत लोकसभा तहकूब करण्यात आली. त्यानंतर दोन वाजता लोकसभेचे कामकाज सुरू झाले. मात्र, गृहमंत्र्यांनी केलेल्या वक्तव्याचा मुद्दा उपस्थित करीत काँग्रेससह विरोधकांनी घोषणाबाजी करताच दोन वाजून ८ मिनिटांच्या सुमारास लोकसभा दिवसभरासाठी तहकूब करण्यात आली.
शाहांच्या वक्तव्याचा विपर्यास : रिजिजू
संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गृहमंत्री अमित शाहांनी केलेल्या वक्तव्याचा काँग्रेसकडून विपर्यास करण्यात आल्याचा दावा केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी केला. राज्यसभेत शाहांनी केलेल्या भाषणाची एक छोटी क्लिप प्रसारित केली जात आहे. त्यात शाहांच्या वक्तव्याचा विपर्यास केला आहे. विरोधकांचे हे कृत्य चुकीचे असून मी त्याचा तीव्र शब्दात निषेध करतो असे स्पष्ट करत रिजिजूंनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली.
शाहांना तत्काळ बरखास्त करावे : खरगे
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गृहमंत्री अमित शाहांची पाठराखण करण्याऐवजी त्यांना तत्काळ बरखास्त करावे, अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल मोदींना आदर असेल तर त्यांनी बुधवारी रात्री १२ वाजेपर्यंत शाहांना पदावरून बरखास्त करावे. शाह यांचे बाबासाहेबांबद्दलचे वक्तव्य निषेधार्ह आहे. सर्वांसाठी आदरणीय असणाऱ्या बाबासाहेबांबद्दल तसे वक्तव्य करणे अत्यंत दुर्दैवी असल्याचे खरगे म्हणाले.
काँग्रेसचे मतपेढीचे राजकारण : भाजप
मतपेढीसाठी डॉ. बाबासाहेब आंबडेकरांच्या नावाचा वापर करून राजकीय पोळी भाजण्याचे काम काँग्रेस करत असल्याचा आरोप भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला. घटनेचे निर्मात डॉ. आंबेडकर जिवंत असताना काँग्रेसने त्यांचा अपमान केला. आता मात्र मतपेढीसाठी हा पक्ष आंबेडकरांच्या नावाचा वापर करत असल्याचे नमूद करत नड्डा यांनी अमित शाहांचा बचाव केला. वरिष्ठ सभागृहातही गृहमंत्र्यांनी बाबासाहेबांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून गदारोळ उडाला. सुरुवातीला राज्यसभेचे कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. मात्र, याच मुद्द्यावरून नंतर राज्यसभा दिवसभर स्थगित करण्यात आली.