Bihar Free Electricity:बिहारमधील विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली नसली तरी राजकारण्यांकडून घोषणा करण्यास सुरुवात झाली आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये मोठी घोषणा केली आहे. निवडणुकीआधीच बिहारमधील घरगुती वीज ग्राहकांना १२५ युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची योजना मंजूर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ३७९७ कोटी रुपयांच्या अतिरिक्त रकमेला मान्यता देण्यात आली. मात्र दुसकीकडे बिहारमध्ये वीज आल्यानंतरच ती मोफत दिली जाणार असल्याचे भाजपच्या मंत्र्यांने म्हटलं. मंत्र्याच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
उत्तर प्रदेशचे ऊर्जा आणि शहरी विकास मंत्री ए.के. शर्मा यांनी नितीश कुमार यांच्या १२५ युनिटपर्यंत मोफत वीज देण्याच्या घोषणेवर मोठं विधान केलं. बिहारमध्ये वीज आल्यावरच ती लोकांना दिली जाईल आणि तेव्हाच बील येईल. जर वीजच आली नाहीतर बील कुठून देणार, असं मंत्री शर्मा यांनी म्हटलं. ए.के. शर्मा यांच्या या विधानावरुन काँग्रेसने त्यांना लक्ष्य केलं. भाजप-जेडीयू सरकारने बिहारमध्ये मोफत वीज देण्याची घोषणा केला आहे. भाजप सरकारच्या ऊर्जामंत्र्यांनी या घोषणेला खोडून काढण्याचे काम केले अशी टीका काँग्रेसने केली.
उत्तर प्रदेश सरकारचे ऊर्जा आणि शहरी विकास मंत्री ए.के. शर्मा शनिवारी मथुरा दौऱ्यावर होते. यावेळी एका पत्रकाराने , बिहारमध्ये वीज मोफत मिळणार आहे, उत्तर प्रदेशात असं काही होणार का? असं प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना शर्मा यांनी, "बिहारमध्ये मोफत आहे, पण वीज असेल तरच ती मोफत दिली जाणार आहे. जर वीजच उपलब्ध नसेल तर त्याला मोफतच म्हटले जाईल. वीजच मिळाली नाही तर बिलही मिळणार नाही. झाली ना मोफत वीज," असं म्हटलं.
दरम्यान, बिहारमध्ये मंत्रिमंडळाने शुक्रवारी १ ऑगस्टपासून राज्यातील घरगुती ग्राहकांना दरमहा १२५ युनिट मोफत वीज देण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मंत्रिमंडळाने ऊर्जा विभागाच्या या प्रस्तावाला मान्यता दिली.तसेच बिहार सरकार १.१ किलोवॅट क्षमतेपर्यंतच्या सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्यासाठी घरगुती ग्राहकांना आर्थिक मदत देखील देईल.