Piyush Goel on Trump Tarrif: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत आयात होणाऱ्या भारतीय वस्तूंवर २५ टक्के कर लादण्याची घोषणा बुधवारी केली. ट्रम्प यांनी भारतावर दंड आकारण्याची धमकीही दिली आहे. ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे भारतातील व्यापाराची चिंता वाढली आहेत. दुसरीकडे, लोकसभेत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या २५ टक्के आयात शुल्कावर सरकारची भूमिका मांडली. भारत सरकार सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि देशांतर्गत उद्योगांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असल्याचे मंत्री पियुष गोयल यांनी सांगितले.
भारत आमचा मित्र आहे, असा उल्लेख करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावरच २५ टक्के टॅरिफचा बॉम्ब टाकला. १ ऑगस्टपासून भारतावर २५ टक्के आयात शुल्क लावले जाईल, असं ट्रम्प म्हणाले. दोन्ही देशांतील व्यापार कराराच्या वाटाघाटी काही मुद्यांवर अडल्यानंतर ट्रम्प यांनी ही घोषणा केली. रशियाकडून लष्करी साहित्य व तेलाची खरेदी तसेच द्विपक्षीय व्यापारातील अडथळे यामुळे भारताला दंडही लावला जाईल, असे ट्रम्प यांनी म्हटलं. डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयाने भारतीय उद्योगांवर मोठे संकट आले आहे. त्यानंतर आता सरकारने याबाबत भाष्य केलं.
"२ एप्रिल २०२५ रोजी, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी परस्पर करांबाबत एक कार्यकारी आदेश जारी केला होता. ५ एप्रिल २०२५ पासून १० टक्के बेसलाइन टॅरिफ लागू झाला. १० टक्के बेसलाइन टॅरिफसह भारतासाठी एकूण २६ टक्के टॅरिफ जाहीर करण्यात आला होता. हा अतिरिक्त टॅरिफ ९ एप्रिल २०२५ रोजी लागू होणार होता. पण १० एप्रिल २०२५ रोजी, सुरुवातीला तो ९० दिवसांसाठी वाढवण्यात आला आणि नंतर १ ऑगस्ट २०२५ पर्यंत वाढवण्यात आला," असं पियुष गोयल यांनी म्हटलं.
"दोन्ही बाजूंमध्ये द्विपक्षीय बैठकांच्या चार फेऱ्या झाल्या आहेत. कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी अनेक महत्त्वाच्या बैठका झाल्यात. टॅरिफच्या मुद्द्यावर अमेरिकेसोबत द्विपक्षीय चर्चा सुरू आहे. आम्ही सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेत आहोत. आम्ही व्यावसायिक आणि भागधारकांशी बोलत आहोत. जागतिक व्यापारात भारताचे १६ टक्के योगदान आहे. राष्ट्रीय हितासाठी आवश्यक असलेले प्रत्येक पाऊल उचलणार आहोत," असेही पियुष गोयल म्हणाले.
तसेच "एका दशकापेक्षा कमी कालावधीत, भारत जगातील कमकुवत अर्थव्यवस्थांमधून बाहेर पडून एक मोठी अर्थव्यवस्था आणि जगातील पाच सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थांपैकी एक बनली आहे. युएई, यूके, ऑस्ट्रेलियासोबत व्यापार करार झाले आहेत. आम्ही इतर देशांसोबत अशाच प्रकारच्या करारांसाठी वचनबद्ध आहोत," असं पियुष गोयल यांनी म्हटलं.
दरम्यान, अमेरिका राष्ट्राध्यक्षांनी द्विपक्षीय व्यापाराबाबत केलेल्या वक्तव्याची भारत सरकारने गंभीर दखल घेतली असून, त्याचे संभाव्य परिणाम समजून घेण्यासाठी अभ्यास सुरू केला आहे. शेतकरी, उद्योजक आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग यांचे हित जपणे आणि त्यांना चालना देणे याला सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. सरकार आवश्यक ती सर्व पावले उचलेल आणि याआधी युकेसोबतच्या करारासारखेच प्रयत्न केले जातील, असे वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने बुधवारी स्पष्ट केलं होतं.