उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथील मसनपूर गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे पतीच्या मृत्यूनंतर शोकाकुल झालेल्या एका महिलेने विष प्राशन करून जीवन संपवले. या घटनेमुळे परिसरातील रहिवाशांनाही अश्रू अनावर झाले आहेत. तसेच एकमेकांवर अखेरपर्यंत प्रेम करणाऱ्या या पती-पत्नीची एकत्र अंत्ययात्रा काढून त्यांच्यावर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार ही घटना किरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मसनपूर गावात घडली आहे. येथील रहिवासी असलेले भीम सिंह हे मागच्या अनेक वर्षांपासून आजारी होते. त्यांच्यावर हृषिकेश येथील एम्स आणि देहराडूनमधील डोईवाला जौलिग्रांट रुग्णालयात उपचार सुरू होते. यादरम्यान, त्यांची पत्नी राजकुमारी रात्रंदिवस त्यांची काळजी घेत होती.
दरम्यान, सोमवारी संध्याकाळी उपचारांदरम्यान, भीम सिंह यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मंगळवारी सकाळी त्यांचा मृतदेह गावात आणण्यात आला. तेव्हा पत्नी राजकुमारी हिला शोक अनावर झाला. ती मृतदेहाला बिलगून ओक्साबोक्सी रडत होती. शोक अनावर झालेली राजकुमारी अचानक खोलीत गेली. त्यानंतर शोधाशोध केली असता तिथे ती बेशुद्धावस्थेत नातेवाईकांना सापडली.
नातेवाईकांनी तिला तातडीने डॉक्टरांकडे नेते. मात्र तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. राजकुमारी हिने विषप्राषन करून जीवन संपवल्याचे समोर आले. या घटनेमुळे गावात शोकाचं वातावरण निर्माण झालं. त्यानंतर ग्रामस्थांनी पती-पत्नीची एकत्रित अंत्ययात्रा काढून त्यांच्यावर एकाच चितेवर अंत्यसंस्कार केले.