Ujjwal Nikam Latest News: लोकसभा निवडणुकीत पराभव पदरी आलेल्या प्रसिद्ध वकील उज्वल निकम यांचे खासदार होण्याचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्य म्हणून त्यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी चार व्यक्तीची राज्यसभेवर नियुक्ती केली असून, त्यासंदर्भातील अधिसूचनाही निघाली आहे.
राष्ट्रपती नामनिर्देशित सदस्यांच्या जागा रिक्त झाल्या होत्या. त्या जागांवर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी नवीन चार सदस्यांची नियुक्ती केली. यात प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम, माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला, इतिहासकार डॉ. मिनाक्षी जैन आणि केरळमधील सामाजिक कार्यकर्ता सी. सदानंदन मास्टर यांचा समावेश आहे.
उज्ज्वल निकम हे वकील म्हणून देशात प्रसिद्ध आहेत. गुन्हेगारीविषय खटल्यांमध्ये त्यांचे नाव घेतले जाते. मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याचा खटलाही त्यांना लढवला होता. या खटल्यात कसाबला फाशीची शिक्षा झाली होती.
हर्षवर्धन श्रृंगला यांनी भारताचे परराष्ट्र सचिव म्हणून काम पाहिले आहे. परराष्ट्र धोरणाबद्दल त्यांना मोठा अनुभव आहे. डॉ. मीनाक्षी जैन या प्राध्यापक असून, इतिहासकार म्हणून ओळखल्या जातात. तर केरळातील सदानंदर मास्टर हे शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षांपासून कार्य करत आहेत.
उज्ज्वल निकम यांचा लोकसभा निवडणुकीत झाला होता पराभव
उज्ज्वल निकम यांनी भाजपकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ते निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या मतदारसंघात काँग्रेसच्या वर्षा गायकवाड निवडणूक लढवत होत्या.
वर्षा गायकवाड यांनी उज्ज्वल निकम यांचा पराभव केला होता. या मतदारसंघाच्या पूनम महाजन या खासदार होत्या, पण भाजपने त्यांचे तिकीट कापून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली होती.