श्रीनगर : काश्मीर खोऱ्यातील अनंतनाग जिल्ह्यात वाहनातून आलेल्या दहशतवाद्यांनी शुक्रवारी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पथकावर हल्ला चढवला. त्यात दोन जवान शहीद झाले, तर एक जवान गंभीररित्या जखमी झाला आहे. याशिवाय एक स्थानिक रहिवासीही या हल्ल्यात जखमी झाला आहे.असिस्टंट सब इन्स्पेक्टर मीना व कॉन्स्टेबल शिपाई या दोघांना दहशतवाद्यांच्या गोळीबारात वीरमरण आल्याचे सीआरपीएफतर्फे सांगण्यात आले. हा हल्ला लश्कर-ए-तय्यबा या दहशतवादी संघटनेच्या दोन अतिरेक्यांनी केल्याचे सांगण्यात येत. लश्कर-ए-तय्यबाचा प्रवक्ता अब्दुल्ला गझनवी याने ईमेलद्वारे हा हल्ला आमही केल्याचा दावा केला आहे. अचबल चौकात सीआरपीएफचे पथक गस्तीसाठी निघाले असताना दोन दहशतवाद्यांनी अचानक त्यांच्यावर गोळीबार केला.
अंदाधुंद गोळीबार करून दोघे दहशतवादी पळून गेले. त्यांचा शोध सुरू आहे. गेल्या आठवड्यात पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. तेव्हा दोघे जण पळून गेले होते. त्या दोघांनीच आजचा हल्ला केल्याची माहिती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांनी दिली. सीआरपीएफ वा पोलिसांनी मात्र या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.