उत्तर प्रदेशमधील पीलीभीत येथील एका सरकारी रुग्णालयात दोन दिवसांच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला. या नवजात बाळाला एक्सपायर झालेले ग्लुकोज देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे मुलाची प्रकृती अधिकच बिकट झाली. यानंतर, लखनौला नेत असताना वाटेतच बाळाचा मृत्यू झाला. कुटुंबातील सदस्यांनी या प्रकरणाचा निषेध करुन कारवाईची मागणी केली. कुटुंबीयांनी पोलिसांकडे तक्रारही दाखल केली आहे.
हरियाणाचे मुख्यमंत्री प्यायले यमुनेचे पाणी; केजरीवालांनी केलेला नदीत विष मिसळल्याचा आरोप
या प्रकरणी कारवाई करत रुग्णालय प्रशासनाने दोन स्टाफ नर्सना निलंबित केले आहे. हे प्रकरण जिल्हा महिला रुग्णालयातील 'स्पेशल न्यूबॉर्न केअर युनिट' मधील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गायभोज गावातील रहिवासी अमन सिंह यांच्या पत्नी राधा सिंह यांनी २७ जानेवारी रोजी मुलाला जन्म दिला. २८ जानेवारी रोजी जेव्हा मुलाने दूध प्यायले नाही तेव्हा त्याला जिल्हा रुग्णालयाच्या एसएनसीयू वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. काही वेळाने, डॉक्टरांनी सांगितले की मुलाची प्रकृती गंभीर आहे आणि त्याला लखनौला रेफर करण्यात आले आहे.
कुटुंब मुलाला घेऊन रुग्णवाहिकेतून लखनौला जात होते. यानंतर वाटेत मुलाची प्रकृती बिघडली यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी कुटुबीयांनी रुग्णालयावर आरोप केले. एसएनसीयू वॉर्डमध्ये मुलाला एक्सपायर झालेले ग्लुकोज देण्यात आल्याचा आरोप केला. पोलिसांनी नवजात बाळाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
नातेवाईकांचा गंभीर आरोप
'मुलाला देण्यात आलेल्या ग्लुकोजची मुदत २०२४ च्या पाचव्या महिन्यात संपली होती, असा आरोप नातेवाईकांनी केला. इतक्या महिन्यांपूर्वी एक्सपायर झालेली ग्लुकोजची बाटली एसएनसीयू वॉर्डमध्ये का ठेवली, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
पिलीभीतचे मुख्य वैद्यकीय अधिकारी आलोक कुमार यांनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे. या प्रकरणी दोन सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली आहे. प्राथमिक चौकशीनंतर, स्टाफ नर्स प्रीती जयस्वाल आणि पुष्पा मिश्रा यांना निलंबित करण्यात आले आहे.