पारदर्शक निवड प्रक्रियेमुळे फडकला तिरंगा- नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 05:22 AM2022-08-16T05:22:19+5:302022-08-16T05:23:43+5:30

Independence Day : अनेक क्रीडा संस्थांमधील घराणेशाही संपुष्टात आल्याने योग्य गुणवत्तेला संधी मिळाली. यामुळेच क्रीडाविश्वात तिरंगा फडकू लागला आणि राष्ट्रगीताची धून वाजू लागली,’ असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

Tricolor hoisted due to transparent selection process-Narendra Modi | पारदर्शक निवड प्रक्रियेमुळे फडकला तिरंगा- नरेंद्र मोदी

पारदर्शक निवड प्रक्रियेमुळे फडकला तिरंगा- नरेंद्र मोदी

Next

नवी दिल्ली : ‘विविध खेळांमधील संघ निवड प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने झाल्याचा मोठा फायदा भारताला आहे. तसेच, अनेक क्रीडा संस्थांमधील घराणेशाही संपुष्टात आल्याने योग्य गुणवत्तेला संधी मिळाली. यामुळेच क्रीडाविश्वात तिरंगा फडकू लागला आणि राष्ट्रगीताची धून वाजू लागली,’ असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर मोदी यांनी आपल्या भाषणात क्रीडा क्षेत्रातील भारताच्या यशाचे कौतुक केले. मोदी यांनी म्हटले की, ‘घराणेशाहीचा नकारात्मक प्रभाव केवळ राजकारणापुरताच नव्हता, तर एकेकाळी हा प्रभाव क्रीडाक्षेत्रातही होता. आपण मागील काही दिवसांमध्ये खेळांमधील यश पाहिले.

याआधीही आपल्याकडे गुणवत्तेची कमतरता नव्हती. पण, त्यावेळी घराणेशाहीचा परिणाम भोगावा लागत होता. असे खेळाडू मैदानापर्यंत नक्की पोहोचत होते, पण त्यांना जय-पराजयाने काही फरक पडत नव्हता. अशा कठीण परिस्थितींशी सामना करत खेळाडूंना संपूर्ण आयुष्य झगडावे लागत होते. पण आता बदल झाला आहे आणि खेळाडू यशाचे शिखर गाठत आहेत. सुवर्ण आणि रौप्यची चमक आपल्या खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावत आहेत.’

मोदी पुढे म्हणाले की, ‘जेव्हा पारदर्शकता आली, गुणवत्तेच्या आधारे खेळाडूंची निवड होऊ लागली, तेव्हा क्रीडाविश्वात भारताचा तिरंगा अभिमानाने फडकू लागला आणि राष्ट्रगीताची धून वाजू लागली. ही केवळ सुरुवात आहे आणि येथे भारत थकणार किंवा थांबणार नाही. ते दिवस आता दूर नाहीत, जेव्हा आपण खूप सारे सुवर्ण पटकावू.’

‘टॉप्स’ ठरले निर्णायक
गेल्या वर्षी झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने विक्रमी ७ पदकांची कमाई करताना एक सुवर्ण, दोन रौप्य आणि चार कांस्य पदके जिंकली होती. त्यानंतर नुकत्याच झालेल्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेत भारतीयांनी २२ सुवर्ण पदकांसह एकूण ६१ पदके पटकावली. विशेष म्हणजे खेळाडूंना मदत म्हणून भारतीय क्रीडा प्राधिकारणाच्या (साइ) टार्गेट ऑलिम्पिक पोडियम योजना (टॉप्स) निर्णायक योजना ठरली. यामुळे अनेक खेळाडूंना सरावासाठी विदेशात जाण्यासाठी आर्थिक मदत मिळाली. वर्षभर साइद्वारे खेळाडूंच्या कामगिरीवर नजर ठेवली जाते.

Web Title: Tricolor hoisted due to transparent selection process-Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.