Arvind Kejriwal ( Marathi News ) :दिल्लीत 'आप'चा मोठा पराभव झाला. दिल्लीत भाजपाला मोठं यश आलं असून सत्ता स्थापनेसाठी तयारी सुरू केली आहे. दुसरीकडे, पंजाबमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. 'आप'चे नेते अरविंद केजरीवाल अॅक्शनमोडवर आले आहेत. केजरीवाल यांनी पंजाबमधील आमदारांची दिल्लीत बैठक बोलावली आहे.
अरविंद केजरीवाल यांनी ११ फेब्रुवारी रोजी पंजाबमधील आमदारांना दिल्लीत बैठकीसाठी बोलावले आहे. यामुळे पंजाबमध्ये सोमवारी होणारी कॅबिनेट मिटींग स्थगित केली आहे.
बैठकीचा अजेंडा स्पष्ट नाही
आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी आमदारांशी केलेल्या चर्चेनंतर मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. यापूर्वी मंत्रिमंडळाची बैठक ६ फेब्रुवारी रोजी होणार होती, पण नंतर ती १० फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आली. केजरीवाल यांनी बोलावलेल्या बैठकीचा अजेंडा अजूनही स्पष्ट झालेला नाही.
'आप'च्या संयोजकांनी बोलावलेली बैठक देखील महत्त्वाची आहे, कारण पंजाबच्या आमदारांच्या कारभारावर सतत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दिल्लीची सत्ता हातातून गेली आहे. अशा परिस्थितीत पक्षाची संपूर्ण जबाबदारी पंजाबवर आहे. राजकीयदृष्ट्या, आम आदमी पक्षाला पंजाबमध्येही सतत पराभवाचा सामना करावा लागत आहे. यामुळे आता अरविंद केजरीवाल अॅक्शनमोडवर आले आहेत.
पंजाबमध्ये आप फुलटल्याचा काँग्रेसचा दावा
दिल्लीत आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर काँग्रेसने पंजाबमधील राजकीय समीकरण बदलण्याचा दावा केला आहे. आप'चे प्रमुख अरविंद केजरीवाल आता पंजाबचे मुख्यमंत्री होण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी चर्चा आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते पंजाबला मध्यावधी निवडणुकांची तयारी करण्याच्या सूचना दिल्याच्या चर्चा सुरू आहेत.
पंजाब विधानसभेतील विरोधी पक्षनेते प्रताप सिंह बाजवा म्हणाले की, दिल्लीतील दारुण पराभवानंतर अरविंद केजरीवाल आता पंजाबला जातील, जिथे ते राज्याचे मुख्यमंत्री बनण्याचा प्रयत्न करतील.
काही दिवसांपूर्वी आपचे प्रदेशाध्यक्ष अमन अरोरा यांनी मोठं विधान केले होते. पंजाबचा मुख्यमंत्री देखील हिंदू असू शकतो आणि मुख्यमंत्रीपद भूषवणारी व्यक्ती पात्र असली पाहिजे आणि त्याला हिंदू किंवा शीख या दृष्टिकोनातून पाहू नये, असं विधान त्यांनी केले होते.