कुंभपर्वाच्या पूर्वसंध्येला आज शोभायात्रा
By admin | Updated: July 12, 2015 21:40 IST
२५ संस्थांचा सहभाग : साधू-महंतही होणार सहभागी
कुंभपर्वाच्या पूर्वसंध्येला आज शोभायात्रा
२५ संस्थांचा सहभाग : साधू-महंतही होणार सहभागीनाशिक : बारा वर्षांनी येणार्या सिंहस्थ कुंभमेळ्याची सुरुवात समजल्या जाणार्या पुरोहित संघाच्या ध्वजारोहणाची तयारी पूर्ण झाली असून, राज्यातील विविध संस्थांसह साधू-महंतांच्या सहभागाने सोमवारी (१३) दुपारी ३ वाजता ही शोभायात्रा निघणार आहे. लेझिम पथकासह मर्दानी खेळांचाही या मिरवणुकीत समावेश असेल. गंगा गोदावरी पंचकोठी पुरोहितच्या वतीने आयोजित या शोभायात्रेस काळाराम मंदिर येथून प्रारंभ होणार असल्याची माहिती अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी दिली. शोभायात्रेत निर्मोही, निर्वाणी आणि दिगंबर अनी आखाड्यांचे साधू-महंत उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय गंगा गोदावरी वतनदार, नाभिक आणि सनई संघटना, श्रीमान सत्यवादी मित्रमंडळ, माउली प्रतिष्ठान ढोलपथक, सनातन संस्था, महाराष्ट्र राज्य बारा बलुतेदार महासंघ, विघ्नहर ढोल पथक, पंत भजनी मंडळ, श्रीराम शक्तिपीठ ब्राचारी आश्रम, प्रजापिता ब्राकुमारी विश्वविद्यालय, जंगलीदास महाराज भक्तपरिवार, ईस्कॉन परिवार, माहेश्वरी महिला मंडळ, नाशिक सेवा समिती, शिव गोरक्ष सेवा मंडळ, हिंदू एकता आंदोलन पक्ष, श्री दत्त श्रीधर सेवा मंडळ, शनैश्वर सेवा मंडळ, बजरंग दल, बॉश सेवानिवृत्त कामगार संघटना, सिद्ध गणेश महाराज समाधी ट्रस्ट या संस्थांचे चित्ररथही शोभायात्रेत सहभागी असतील. याशिवाय शोभायात्रा मार्गावर राजाभाऊ भुतडा, पिंपळपार चौक, वेलकम सहकार्य मित्रमंडळ यांसह विविध संस्था आणि मित्रमंडळांनी पाणीवाटपाची व्यवस्था केली आहे.शोभायात्रेचा मार्गशोभायात्रा काळाराम मंदिरापासून सुरू होईल. नागचौक, जुना आडगाव नाका, गणेशवाडी, आयुर्वेद सेवा संघ, दिल्ली दरवाजा, नेहरू चौक, धुमाळ पॉईंट, भगवंतराव मिठाई, मंगेश मिठाई, रविवार कारंजा, मालेगाव स्टॅण्डपासून रामकुंडापर्यंत ही यात्रा काढण्यात येईल. धर्मध्वज तयारनाशिकच्या रामकुंड परिसरात उभारण्यात येणार्या या धर्मध्वजाचे काम पूर्ण झाले आहे. त्यासाठी सिंहस्थाचा एक आणि गोदावरी मंदिराचा एक असे दोन ध्वज तयार करण्यात आले आहेत. सिंहस्थाचा ध्वज आयताकृती असून, त्याची लांबी १५ फूट आणि रुंदी ४.५ फूट आहे. भगव्या रंगाच्या या ध्वजावर सिंहस्थाचा सिंह आणि अमृतकलश यांचे चित्र आहे, तर दुसरा ध्वज गोदावरी मातेचा असून, त्यावर मगरीचे चित्र असेल. ध्वजस्तंभाचे वजन ५०१ किलोधर्मध्वज आणि गोदावरी मातेच्या ध्वजासाठी बनवण्यात आलेले स्तंभ ५०१ किलो वजनाचे पितळी धातूचे बनविण्यात आले आहेत. हे स्तंभ गुजरातमधील सोमपुरा येथून हे स्तंभ तयार करण्यात आले आहेत. देशातील महत्त्वाची मंदिरे आणि मूर्ती तयारकरणार्या कारागिरांकडून हे स्तंभ तयार करून घेण्यात आले आहेत. उद्या ध्वजारोहणकुंभपर्वाची मुख्य सुरुवात असलेले पुरोहित संघाचे ध्वजारोहण उद्या (दि. १४) सकाळी ६ वाजून १६ मिनिटांनी होणार असून, त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, श्रीपाध नाईक, पालकमंत्री गिरीश महाजन यांच्यासह अनेक नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती आमदार बाळासाहेब सानप यांनी दिली. वायफाय कार्यान्वितसिंहस्थाअंतर्गत रामकुंड परिसरात बसविण्यात आलेली वायफाय यंत्रणा आज कार्यान्वित करण्यात आली. वस्त्रांतरगृहातील इमारतीत त्याचे यंत्र बसविण्यात आले आहे. त्याची चाचणी घेण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते. प्रशासनाचे असहकार्ययंदा प्रथमच केंद्र आणि राज्य शासनाने सिंहस्थासाठी भरघोस निधी दिलेला असतानाही स्थानिक प्रशासन आणि महापालिकेने पुरोहित संघाशी समन्वय न ठेवता कामे केली असून, त्यात समन्वय ठेवला असता तर आणखी चांगली कामे झाली असती, असे पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल म्हणाले. आम्हाला अतिक्रमणच करायचे असते, तर पूर्वजांपासून रामकुंडावर व्यवसाय करणार्या अनेक पुरोहितांची प्रत्येकी एक टपरी तरी रामकुंडावर आम्ही उभारली असती, असा टोला त्यांनी अतिक्रमणाचा आरोप करणार्या पालिका प्रशासनावर लगावला, परंतु वस्त्रांतरगृहाच्या आणि काढलेल्या अतिक्रमणाच्या मुद्यावर शुक्लांसह आमदार बाळासाहेब सानप यांनीही बोलणे टाळले.