शहरं
Join us  
Trending Stories
1
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
2
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
3
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
4
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
5
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
6
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवस्त्र' पाहिलं का?
7
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
8
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
9
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
10
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
11
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
12
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
13
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
14
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
15
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
16
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा
17
तुम्ही फक्त एवढे काम करा, आम्ही पाकिस्तानातून स्वातंत्र होऊ; बलूचची भारताकडे मागणी
18
आई-वडील, बहीण आणि मावशीची केली हत्या, मग जाळले मृतदेह, आता कोर्टाने सुनावली अशी शिक्षा
19
Gold Rates 14 May : सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
20
बॅगा भरा अन् माघारी फिरा! मुंबई इंडियन्ससह या IPL फ्रँचायझी संघांचं टेन्शन वाढलं; कारण...

एक झुंज वादळाशी...!

By admin | Updated: July 18, 2016 14:53 IST

मुंबईच्या तरूणीने तैवानमधील वादळाच्या निमित्ताने अनुभवले निसर्गाचे रौद्र रूप, त्याला भिडणारे नागरिक व वादळाने उन्मळून पडल्यानंतरही निसर्गाची लय मान्य करून नव्याने आयुष्याचा उत्सव साजरा करण्याची वृत्ती.

ऑनलाइन लोकमत 

शिल्पा जोगळेकर, मुंबई

समुद्र किनारा. त्याच्या लगत भातशेती आणि फळाफुलांनी लगडलेली झाडं… अशा निसर्गाने नटलेल्या तायवानच्या पूर्व किनाऱ्यावरील East Coast Land Art Festival 2016मध्ये सहभागी होण्यासाठी मला आमंत्रण आलं… तेव्हा मी फ्रान्समध्ये एक प्रॉजेक्ट पूर्ण करण्याच्या मार्गावर होते… आणि एका महिन्याच्या या फ्रान्सफेरीनंतर घरी परतण्याची तयारी करत होते हे नवीन आमंत्रण स्वीकारणं म्हणजे भारतात न परतता थेट तायवानला जाणं आलं, असे बॅक टू बॅक प्रॉजेक्ट मी कधीच केले नव्हते इतरही अडचणी समोर होत्या… 
माझ्या तायवानच्या पूर्वीच्या भेटींदरम्यान मी हा प्रदेश खूप फिरले होते… पण पूर्वकिना-याला जायला जमलं नव्हतं… मात्र या भागाबद्दल खूप ऐकलं होतं… या प्रदेशाचं वैशिष्ट्य म्हणजे तिथे रहाणारी “आमिस” नावाची आदिवासी जमात. जे कलागुणानी समृद्ध असे लोक आहेत। आता मला माझी कलाकृती इथे करण्याची संधी मिळंत होती… कसं नाही म्हणणार.
आणि मग 9 जून 2016ला मी फ्रान्सहून थेट तायवानमधील तायदोंगला नावच्या छोटयाश्या गावात दाखल झाले.
तायवानी लोक अत्यंत प्रेमळ आणि मनमिळाऊ असतात… मी पोहोचल्यावर तब्बल दोन दिवस त्यांचं आगत्यच चालू राहिलं… शेवटी तिसऱ्या दिवशी मी कामाला सुरवात केली। माझं शिल्प उभारण्याची जागा नक्की झाली।
शेंगेच्या आकाराचं बांबूचं शिल्प करण्याच ठरवलं। त्यासाठी “अंतरंग” हे शीर्षक नककी केलं। अंतरंग याचा एक अर्थ म्हणजे गर्भ प्रेक्षकांना माझ्या कलाकृतीच्या आत जाता यावं आणि निसर्गाच्या कुशीत गेल्यासारखा… किंवा गर्भात गेल्यासारखा अनुभव मिळावा. ही त्या मागची माझी भावना होती।
पुढचे काही दिवस कसे गेले कळलंच नाही… चीनी भाषा येत नसल्याने तिथल्या मदतनीसांशी संवाद साधणं आणि त्यांच्याकडुन काम करून घेणं यात माझा कस लागला… हे संवाद म्हणजे एकमेकांना न समजणारे काही ध्वनी आणि फ्रॅन्टिक हातवारे… 
तीन आठवडयांच्या अविरत मेहेनतीपश्चात… आणि शेकडो हातवाऱ्यांपश्चात… माझी 12 मीटर लांबीची कलाकृती पूर्ण झाली! 
त्याबरोबर बाकीच्या स्थानिक कलाकारांच्या कालाकृती सुद्धा पूर्ण होऊ लागल्या आणि आम्ही सगळे 9 जुलैला आयोजित उद्घाटनासाठी सज्ज झालो. फेस्टिव्हल पूर्ण झाल्याच्या आनंदात गावकरी एका मोठया मेजवानीची तयारी करत होते… 
तोच अशी खबर आली की दोन दिवसात तायदोंगच्या किर्नायावर प्रचंड मोठ वादळ येणार आहे! ही खबर ऐकताच मेजवानीचा कार्यक्र्रम रद्द करून आसपासच्या गावांमधले लोक वादळासाठीची पूर्वतयारी करू लागले। प›यांची छपरं असलेल्या घरांवर वजनाची पोती ठेऊ लागले. खिडक्या दारं घट्ट बंद करून. गाडया स्कूटर्स सुरक्षित ठिकाणी नेऊ लागले। दोन दिवस पुरेल येवढा अन्नसाठा आणि पाण्याची सोय करू लागले। सगळया खानावळी रिकाम्या झाल्या… फळं. भाज्या. दूध. अंडी. ब्रेड़ नूडल्स… असे पदार्थ दुकानांमधून अदृश्य झाले.
 
त्याचं बघून मी ही थोडीफार तयारी केली। वादळाच्या तीव्रतेचा मला फारसा अनुभव नसल्याने हे लोक अतीच गोंधळ घालत आहेत असं मला वाटत होतं। पुढल्या दिवशी चैन चंग नावचा आमचा टॅक्सी ड्रायव्हर मला टायफून वेव्ह्स दाखवायला घेऊन गेला। समुद्राच्या मधोमध रेघ ओढल्या सारखे… राखाडी आणी निळा असे दोन रंग दिसू लागले होते। एका दिशेला लांब समुद्र किर्नाया वरून धूर येताना दिसत होता. पण लवकरच लक्षात आलं की तो धूर नसून र्वायाने उडवलेली रेती होती। फिरत फिरत आम्ही बंदरावर गेलो। कोळी लोक आपापल्या नावा जाड दोरखंडांनी बांधत होते। लाटांची उंची आता चांगलीच वाढू लागली होती… जवळ जवळ 15 ते 20 फूट ऊंच उधळत होत्या लाटा.
 
इतक्यात गाडीतल्या रेडियो वर चेतावनी आली वादळ जवळ येऊ घातलय तेव्हा सर्वांनी आपापल्या घरी जावं। गेस्टहाउस मधे परतण्या आधी मी माझ्या कलाकृतीला स्टीलच्या वायर्स लाऊन अजून मजबुत केलं आणि निश्चिंत पणे गेस्टहाउसला परतले.
संध्याकाळी 8 च्या सुमाराला गेस्टहाउसची मालकिण मला एकटीला वादळात भिती वाटू नये म्हणून माझ्या सोबतीला रहायला आली। तिला मी आई म्हणायचे… म्हणजे चीनी भाषेत मावशी। माझ्या शेजारच्या खोलीत ती झोपायला गेली। मी माझ्या खोलीत बसून माझ्या मित्रांबरोबर चॅटिंग करत होते… तोच प्रचंड वारा आणि पाऊस सुरू झाला. 
“नेपारटाक” नावचं ग्रेड 5 चं वादळ या किना-यावर येऊन पोहोचलं होतं। माझ्या खोलीबाहेर एका अतिप्रचंड कडकडाटाबरोबर त्याने आपली हजेरी नोंदवली.
मी माझ्या खोलीची छोटीशी खिडकी उघडून बाहेर बघण्याचं धाडस केलं… बाहेर सगळया कुंडया उलटून पडल्या होत्या। मोठी झाडं अक्षरशाः पिंगा घालत होती आणि पिंगा घालता घालता कोसळून खाली पडत होती। माझ्या खोलीचं छप्पर उडून जाईल की काय असं मला वाटू लागलं. छपरामधून आणि दाराच्या फटीतून पाणी आत येऊ लागलं। वारा आणि पावसाचं असं मिश्र… रौद्र आणि राक्षसी स्वरूप मी पहिल्यांदाच अनुभवत होते.
 
घाबरून मी खोलीतून बाहेर गेले। बघते तर गेस्टहाउसच्या काचेच्या प्रवेशद्वाराला धरून आई ऊभी होती। ते दार तिने तसं धरलं नसत तर ते नक्कीच फुटून काचा आत आल्या असत्या। तिने खुणेने मला टीव्ही चालू करायला सांगितलं। टीव्ही चालू करून बातम्या ऐकण्याचा प्रयत्न केला तोच विजेच्या तारेतून स्पार्क आले आणि काही वेळा करता दिवे गेले। आई चीनी भाषेत मला काहीतारी सांगण्याचा प्रयत्न करत होती… पण अंधारात… तिच्या मूकाभिनयाविना ते काही मला समजे ना!
हे असं रात्रभर चालू होतं। सकाळी साडे सहाच्या सुमारास अखेरीस वादळ सरलं आणि पाऊस थांबला। रात्रभराच्या थकव्याने जरा डोळा लागला…  मात्र माझ्या कलाकृतीचे एव्हाना काय झाले असेल या विचाराने डोक्यात नवीनच वादळ सुरू झालं.
सकाळी नऊच्या सुमारास आम्ही घराबाहेर पडलो… आसपासची बहुतेक सगळी झाडं पडली होती. आणि बाकीची नागडी झाल्या सारखी। काही घरं कोसळली होती. फोन, इंटरनेट सगळ बंद होतं आणि मला कोणाशीही संर्पक करता येईना। गावात गेले। एकच कॅफे ऊघडा होता तिथे काही ओळखीचे लोक भेटले। हळू हळू इतर कलाकारही गोळा झाले। आम्ही तिघी चौघींनी एका गाडीतून जाऊन आपली शिल्पं बघायचं ठरवलं.
कोलमडलेली घरं. पिरगळून पडलेले छप्परांचे पत्रे. आणि पडलेल्या झाडांमुळे रस्ते बंद झाले होते। केळी. ड्रॅगन फ्रूस्टस. आंबे. कर्मळ. सिताफळ अशा फळांचा जमीनीवर सडा पडला होता। या सगळयातून वाट काढत आम्ही आमच्या शिल्पांपर्यंत पोहोचलो। माझं शिल्पं सुद्धा आडवं झालं होतं। त्यात असलेला स्टीलचा सांगाडा सुरीने कापावा तसा र्वायानी कापला गेला होता. 
एव्हाना फेस्टीवलचे व्यवस्थापक सुद्धा तिथे येऊन पोहोचले। एका कलाकाराने आपल्या कलाकृती साठी खणलेल्या खड्डयात त्यांना एका हरिणाचे पिल्लू आश्रय घेऊन लपलेले आढळलं… बिचारं वादळाच्या तडाख्यात आपली वाट चुकून जंगलातून भरकटलेलं असणार, त्याला त्यांनी लगेच इस्पितळात नेलं. आणि त्यावर प्रथमोपचार करून त्याला पुन्हा जंगलात सोडलं।
व्यवस्थापकांनी ठरवलं की फेस्टिवलचं उद्घाटन आता जुलैच्या 23 तारखेला होईल. मात्र त्याच बरोबर त्यांनी आम्हा कलाकारांना हामी दिली कि या दरम्यान ते सगळया कलाकृत्या दुरूस्त करतील। हे ऐकून त्यांचं  कौतुक वाटलं आणि हे लक्षात आलं की इथे पूर्वकिनाऱ्यावर रहाणाऱ्या माणसंची पोतच निराळी आहे. वर्षानुवर्ष मेहेनतीनी वाढवलेली झाडं. त्यांच्यातून येणारं उत्पन्न. कष्टानी बांधलेली घरं… सगळ काही नष्ट झाल्यावर सुद्धा हे लोक निसर्गाच्या या रौद्र विराट अवताराकडे फिलॉसॉफिकली बघतात.
 
“आम्ही सगळे एकत्र येऊन जोमाने सारं पुन्हा ऊभारू. निर्सगाची लय मान्य करून नव्याने आयुष्याचा उत्सव साजरा करू…” 
हे शब्द कानी पडल्यावर एका क्षणात माझाही आयुष्या कडे बघण्याचा दृष्टिकोण बदलला मनात चालू असलेली अनेक क्षुल्लक वादळं शांत झाली… आणि हा विलक्षण अनुभव मनात साचवून मी मायदेशी परतले.
मात्र आजही मधूनमधून मला फ्लॅशेस दिसतात… आणि क्षणभर हृदयाचे ठोके चुकतात… जेव्हा डोळयांपुढे चमकून जातं… ते वादळ!