शी जिनपिंग भारत दौ:यावर : साबरमती आश्रमाला भेट, गुंतवणुकीला मिळणार चालना
अहमदाबाद : चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा तीन दिवसांचा भारत दौरा प्रारंभ झाल्यानंतर काही तासांतच भारत आणि चीनने तीन करारांवर स्वाक्षरी केली. जिनपिंग यांच्या या भारत भेटीत उभय देश सीमावादासह विविध मुद्दय़ांवर विचारविमर्श
करतील, तसेच व्यापार आणि गुंतवणुकीला चालना देण्यावर भर देतील.
या तीन करारांतर्गत चीनच्या ग्वान्झाऊ आणि अहमदाबाददरम्यान भगिनी शहर समझोता आणि राज्यात एक औद्योगिक पार्क निर्माण करणो तसेच गुआंगडाँग प्रांत आणि गुजरात सरकारमध्ये सांस्कृतिक व सामाजिक संबंध बळकट करण्याबाबतच्या कराराचा समावेश आहे. औद्योगिक पार्क स्थापन करण्याबाबतचा करार चीन विकास बँक आणि गुजरातच्या इंडस्ट्रीयल एक्सटेन्शन ब्युरो यांच्यादरम्यान झाला.
या कार्यक्रमानंतर जिनपिंग आणि त्यांची पत्नी पेंग तसेच मोदी यांनी अहमदाबादच्या साबरमती आश्रमाला भेट दिली. या वेळी मोदींनी या आश्रमाचे ऐतिहासिक महत्त्व जिनपिंग यांना समजावून सांगितले. त्यानंतर चिनी नेत्यांनी साबरमती रिव्हरफ्रंट येथे भेट दिली. जिनपिंग यांच्या या भारत दौ:यात रेल्वे, निर्माण आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांत अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करण्यास आपण उत्सुक असल्याचे संकेत याआधीच चीनने दिले होते. भारत दौ:यावर आलेले जिनपिंग हे तिसरे चिनी राष्ट्राध्यक्ष आहेत. (वृत्तसंस्था)
मेड इन इंडिया..
चिनी उत्पादनांचा प्रचंड गवगवा होतो. त्या पाश्र्वभूमीवर भारत भेटीवर आलेले शी जिनपिंग आणि त्यांच्या पत्नी पेंग या दोघांचाही पेहराव भारतीय शैलीचा होता. तो मेड इन इंडिया असावा असाच भास होत होता. कमरेखाली कट असलेले शी यांचे जॅकेट व पेंग यांचा सलवार- कमीज हे दृश्य भारतीयांसाठी सुखावह होते.